किराणा दुकान फोडून हजारोंची रोकड पळविली

0
33

आगरकर मळ्यातील घटना; अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल

नगर – रात्रीच्या वेळी किराणा दुकानाच्या शटरचे लॉक तोडून आतमध्ये प्रवेश करत दुकानाच्या गल्ल्यात ठेवलेली ९० हजारांची रोकड अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना शिवनेरी मार्ग, आगरकर मळा येथे बुधवारी (दि.१०) सकाळी उघडकीस आली आहे. याबाबत अनिल बाबूलाल कटारिया (वय ५४, रा.शिवनेरी मार्ग, स्टेशन रोड, आगरकर मळा) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कटारिया यांचे शिवनेरी मार्ग, आगरकर मळा येथे शांती डिपार्टमेंटल व जनरल स्टोअर नावाचे दुकान आहे. मंगळवारी (दि.९) रात्री दुकान बंद करून ते ११ वाजता झोपी गेले. बुधवारी (दि.१०) सकाळी ६ च्या सुमारास झोपेतून उठल्यावर त्यांना दुकानाचे शटर अर्धवट उघडे दिसले, त्यामुळे त्यांनी तातडीने दुकानात जावून पाहणी केली असता दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्याने उचकापाचक करत दुकानाच्या गल्ल्यात ठेवलेली ९० हजारांची रोकड चोरून नेली. त्यांनी कोतवाली पोलिसांना याची माहिती दिली. ही माहिती मिळताच पो.नि. प्रताप दराडे, स.पो. नि. जानकर यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांनी ही घटनास्थळी भेट दिली. श्वान पथक, ठसेतज्ज्ञ यांनाही पाचारण करण्यात आले. या प्रकरणी अनिल कटारिया यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं. वि.कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.