खा सुजय विखेंना गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्यास पोलिसांनी नवी मुंबईतून घेतले ताब्यात

0
85

पारनेर – खा. सुजय विखेंना गोळ्या घालण्याची धमकी दिल्याची ऑडिओ लिप व्हायरल झाल्यानंतर धमकी व अश्लील शिवीगाळ केल्या प्रकरणी भाजपाचे पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांच्या फिर्यादी वरून पारनेर पोलिसांनी निवृत्ती उर्फ नाना गंगाराम गाडगे (रा. कळस, ता.पारनेर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला नवी मुंबई येथून मंगळवारी (दि.९) ताब्यात घेण्यात आले आहे. निवृत्ती गाडगे याने गणेश काने (रा. कळस, ता.पारनेर) याच्या मोबाईलवर फोन करून तु असे का म्हणाला की ६० टक्के विखे चालतील आणि ४० टक्के नेते चालतील. असे म्हणत त्याने अश्लील भाषा वापरत सुजय विखे यांना गोळ्या घालू अशी धमकी दिली होती. या कॉल रेकोर्डिंगची लिप रविवारी (दि.७) सोशल मिडीयावर व्हायरल झाली होती. त्यामुळे डॉ. सुजय विखे यांच्यासह महायुतीमधील नेते आक्रमक झाले होते. त्यांनी पोलिस अधीक्षक तसेच जिल्हाधिकारी यांची भेट घेत धमकी देणार्‍या या व्यक्तीला पकडण्यात यावे अशी मागणी केली होती. याबाबत भाजपचे पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांनी सोमवारी (दि.८) पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गाडगे याच्या विरुद्ध भा.दं.वि. कलम २९४, ५०४, ५०५, ५०६, ५०७, १७१ (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पारनेर पोलिसांना आरोपी गाडगे हा नवी मुंबईत असल्याचे समजले. त्यांनी नवी मुंबईतील पथकाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. पोलीस आता आरोपीकडून विविध माहिती जाणून घेणार आहेत. हत्येचा कट कुणी रचला, या कटामध्ये कोणकोण सामील आहे ? हा कट कुठे रचला गेला ? याचा सूत्रधार कोण आहे याबाबत सर्व माहिती पोलीस घेणार आहेत. तसेच तो व्यक्ती कुणाकुणाला भेटला ? त्याला कोण कोण भेटले आदींची देखील तपासणी होणार आहे.