बाजार समितीतील व्यापाऱ्याची १९ लाख रुपयांची फसवणूक

0
23

नगरच्या एकासह पुण्याच्या तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

नगर – बाजार समितीतील व्यापार्‍याने शेतकर्‍यांकडून खरेदी केलेला शेत माल घेवून त्या पोटी देय असलेली १९ लाख ११ हजार ५९७ रुपयांची रक्कम व्यापार्‍याला देण्यास टाळाटाळ करत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नगरमधील एका सह पुणे जिल्ह्यातील तिघे अशा चौघांवर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत व्यापारी प्रफुल्ल पंढरीनाथ नेवसे (रा. भांडेवाडी, ता. कर्जत) यांनी कर्जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी नेवसे यांचे कर्जत बाजार समिती मध्ये श्रीराम ट्रेडर्स हे दुकान असून ते शेतकर्‍यांकडून शेतमाल खरेदी करून त्याची मोठमोठ्या व्यापार्‍यांना विक्री करतात. यासाठी काही दलालांच्या मध्यस्थीनेही हा व्यवहार केला जातो. १६ नोव्हेंबर २०२२ ते २२ डिसेंबर २०२२ या कालावधीत त्यांनी नगर मधील दलाल अशोक लक्ष्मण कापले (रा. धनश्री अपार्टमेंट, बालाजी नगर, अहमदनगर) याच्या मार्फतीने निलेश एकनाथ चौधरी (रा. पेठ नायगाव, ता. हवेली, पुणे) यांच्या सह्याद्री अ‍ॅग्रो पोल्ट्री फार्म व काळभैरवनाथ ट्रेडिंग कंपनीला ६ लाख ५७ हजार २२८ रुपयांची मका, स्वप्नील शिवाजी चौधरी (रा. पेठ नायगाव, ता. हवेली, पुणे) यांच्या महालक्ष्मी पोल्ट्री फार्म यांना ४ लाख ४० हजार ४९६ रुपयांची मका तसेच दिपक शिवाजी कांचन (रा. उरुळी कांचन, पुणे) यांच्या ८ लाख १३ हजार ८५५ रुपये किमतीची मका दिली होती. या तिघांकडून १९ लाख ११ हजार ५९७ रुपयांची रक्कम येणे बाकी असून त्यांच्या कडे वारंवार मागणी करूनही त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ करत आपली फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी चौघांच्या विरोधात भा.दं. वि.कलम ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.