आदर्श गाव हिवरे बाजार येथे १६ एप्रिलपासून श्रीराम कथा

0
24

नगर – लोकसहभागातून गावाच्या सर्वांगीण विकासाचा आदर्श निर्माण करणार्‍या नगर तालुयातील आदर्शगाव हिवरे बाजार गावचे ग्रामदैवत मुंबादेवीचे मंदिरास ’क’ वर्ग तीर्थस्थळ म्हणून महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. यानिमित्ताने या तीर्थस्थळाच्या विकासाबाबत, देखभालीबाबत व मंदिराच्या पूजापाठाच्यादृष्टीने नियोजन करून हिवरे बाजार गाव संस्कृतग्राम करण्यासाठी नव्याने व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. दरम्यान, श्रीराम नवमी निमित्त १६ ते २३ एप्रिल दरम्यान हिवरे बाजारामध्ये श्रीराम कथा निरूपण सप्ताह होणार आहे. गुढीपाडवा निमित मंगळवारी हिवरे बाजारामध्ये ग्रामस्थ सभा झाली. मराठी नववर्षाच्या शुभेच्छा ग्रामस्थांनी एकमेकांना दिल्या. पद्मश्री पोपटराव पवार यांनी यावेळी गावकर्‍यांना मार्गदर्शन केले. १६ ते २३ एप्रिल दरम्यान चैत्रपौर्णिमा ते हनुमान जयंतीपर्यंत होणार्‍या अखंड हरीनाम सप्ताहात श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. रामायण अभ्यासक ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांच्या रसाळ अमृतवाणीतून पंचक्रोशीतील भाविकांना श्रीरामकथा श्रवण करण्याचे भाग्य लाभणार आहे.

अयोध्येत भगवान श्रीराम यांच्या भव्यदिव्य मंदिराचा पायाभरणी समारंभ ५ ऑगस्ट २०२० रोजी झाला. त्याचवेळेस हिवरे बाजारमधील श्रीराम मंदिराच्या कामाचाही शुभारंभ झाला होता. त्यानंतर वर्षापूर्वी या मंदिरात १४ एप्रिल २०२२ रोजी मूर्तीची प्राणप्रतीष्ठा केली. २२ जानेवारी २०२४ रोजी श्रीरामजन्मभूमीत उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात श्रीरामलल्लाच्या दिव्य मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. या सोहळ्याचे विशेष निमंत्रण पद्मश्री पोपटराव पवार यांना मिळाले होते. त्या सोहळ्यास गावाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिलेल्या पवारांना कृतकृत्य झाल्याचे समाधान लाभले. हिवरे बाजारच्या विकासात ज्या ज्ञात-अज्ञात व्यक्तीनी योगदान दिले, त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करताना श्रीराममूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यास उपस्थित राहून प्रभूरामास दंडवत घालून दर्शन घेण्याचे परमभाग्य त्यांना लाभले. हा एक पवित्र योग तर आहेच शिवाय आपल्या सर्वाच्या अनेक पिढ्यांचे पुण्यकर्म आहे, अशी भावना पदमश्री पवार यांची आहे. श्रीराम कथेचे आयोजन ही सर्व हिवरे बाजार परिवारासाठी तसेच राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, पत्रकारिता, प्रामाणिकपणे गुणवत्तादायी कामे करणारे ठेकेदार या सर्वांसाठी पुण्यपर्वणी गावाने मानली आहे. या सर्वांचा सन्मान या सोहळ्यात केला जाणार आहे.