वर्दळीच्या ठिकाणी महिलेच्या गळ्यातील दागिने पळविले

0
18

नगर – रूग्णालयात उपचार घेत असलेल्या मावस भावाला भेटण्यासाठी जात असताना वृध्द महिलेच्या गळ्यातील सोन्याची साडेतीन तोळ्याची गोफ चैन व दोन तोळ्याचे सोन्याचे पेन्डल असे १ लाख ९८ हजाराचे साडे पाच तोळ्याचे दागिने दुचाकीवरील दोघांनी चोरून नेले आहे. शनिवारी (दि.६) रात्री नऊ वाजता आनंदऋषी हॉस्पिटलच्या गेट समोर ही घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोन अनोळखी चोरट्यांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीमती गुलाब दिलीप कटारीया (वय ६०, रा. बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा मावस भाऊ आनंदऋषी हॉस्पिटल येथे उपचार घेत असल्याने त्यांना भेटण्यासाठी फिर्यादी व त्यांची आई विमल शेलोत शनिवारी रात्री बालाजी कॉलनी येथून रिक्षाने आनंदऋषी हॉस्पिटल येथे गेल्या होत्या. त्या गेटवर आल्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या चोरट्याने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची गोफ व सोन्याचे पेन्डल असा साडेपाच तोळ्याचा ऐवज बळजबरीने हिसकावून चोरून नेला. सोने ओरबडल्यानंतर ते दोघे भरधाव वेगाने सक्कर चौकाच्या दिशेने निघुन गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.