मतदानाने लोकशाही मजबूत होणार असून, रक्तदानप्रमाणे मतदानदेखील श्रेष्ठ : डॉ. पारस कोठारी

0
30

भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये मतदार जागृती, नाईट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी केला मतदानाचा संकल्प

नगर – मतदानाने लोकशाही मजबूत होणार आहे. रक्तदानप्रमाणे मतदान देखील श्रेष्ठ दान आहे. आपल्या एका मताने चांगला व सक्षम उमेदवार निवडून आल्यास त्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सुटतात. मतदान समाजाचे भविष्य घडविण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचे डॉ. पारस कोठारी यांनी सांगितले. हिंद सेवा मंडळ संचलित भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये मतदार जागृती अभियान राबवून लोकशाहीचा जागर करण्यात आला. नाईट शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता, निर्भय व धर्मनिरपेक्षपणे मतदान करुन लोकशाही सक्षम करण्याचा संकल्प केला. जागर लोकशाहीचा या उपक्रमांतर्गत मतदान जनजागृतीसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमासाठी रात्र शाळेचे चेअरमन डॉ. पारस कोठारी, हिंद सेवा मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक अजित बोरा, रात्र शाळेचे प्राचार्य सुनील सुसरे, गजेंद्र गाडगीळ, महादेव राऊत, उज्वला साठे, वैशाली दुराफे, वृषाली साताळकर, शिवप्रसाद शिंदे, संदेश पिपाडा, शरद पवार, मंगेश भुते, कैलास करांडे, प्रशांत शिंदे, अशोक शिंदे, स्वाती होले, अनिरुद्ध देशमुख, अनिरुद्ध कुलकर्णी, पै. नाना डोंगरे, अविनाश गवळी, मनोज कोंडेजकर, कैलास बालटे आदींसह शिक्षक, शिक्षकेतर व विद्यार्थी उपस्थित होते. अजित बोरा म्हणाले की, मतदान करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. आपल्या मतातून लोकशाहीला बळ मिळणार असून, योग्य उमेदवार निवडून येणार आहे.

रात्र शाळेतील जवळपास बरेचशे विद्यार्थी हे मतदार असल्याने त्यांना मतदानाचा हक्क असून, त्यांनी हा हक्क बजावण्याचे त्यांनी आवाहन केले. प्रास्ताविकात प्राचार्य सुनील सुसरे यांनी मतदानाचे महत्त्व विशद करुन प्रत्येकाने लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याचे स्पष्ट केले. विद्यालयात शिकणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याने मतदान करावे. त्याचप्रमाणे कुठल्याही आमिषाला बळी न पडता, निकोप वातावरणात सक्षम उमेदवारांना मतदान करण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले. मतदानाचा हक्क बजावण्याच्या दृष्टीने शिवप्रसाद शिंदे सर यांनी विद्यार्थ्यांना प्रतिज्ञेच्या माध्यमातून शपथ देऊन मतदानाचा संकल्प करण्यात आला. बीएलओ दीपक शिंदे सर यांनी नवीन मतदार नोंदणी व इतर दुरुस्ती संदर्भात माहिती दिली. मतदान जनजागृतीसाठी ये पुढे मतदान कर, लोकशाहीचा सन्मान कर!, मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो! यासारख्या निवडणूक गीतांचा आणि मतदार साक्षरता गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. सूत्रसंचालन शरद पवार यांनी केले. आभार महादेव राऊत यांनी मानले.