छाप्यासाठी पोलिसांना पंच उपलब्ध करून न दिल्याने एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यावर झाला गुन्हा दाखल

0
19

नगर – पंच उपलब्ध करुन देणे कायद्याने बंधनकारक असतानाही छापा टाकण्यासाठी पंच देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी तारकपूर बस स्थानक नियंत्रकाविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्री.भालेराव (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे. तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये गांजा विक्रीवर तोफखाना पोलिसांनी छाप्याचे नियोजन केले होते. या छाप्यासाठी पंच मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे तारकपूर आगार प्रमुखाना लेखी पत्र सायंकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास देण्यात आले होते. तारकपूर बस स्थानक नियंत्रक कक्षात असलेले श्री.भालेराव (पुर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांना पंच म्हणून कर्मचारी मिळण्यासाठी लेखी रिपोर्ट सादर केल्यावर त्यांनी पंच म्हणून कोणत्याही कर्मचार्‍यांना न कळविता पंच देण्यास उद्देशपूर्वक टाळाटाळ केली.

शासन आदेशानुसार सात वर्ष किंवा सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये सरकारी कर्मचारी पंच म्हणून देण्याबाबत आदेश असताना, तसेच लोकसेवक म्हणून सार्वजनिक कर्तव्य बजावण्याकामी सहाय्य म्हणून पंच उपलब्ध करुन देणे कायद्याने बंधनकारक असताना पंच देण्यास टाळाटाळ केली. तसेच इतर कर्मचार्‍यांना पंच होण्यापासून परावृत्त केल्याने तोफखाना पोलिस ठाण्यात कलम १८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.