मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
26

प्लेग कशामुळे होतो?
काही वर्षांपूर्वी प्लेगने भारतात हाहाःकार
उडवून दिला होता. सूरत, बीड, दिल्ली अशा शहरात
प्लेगचे खूप रोगी सापडले. काही मृत्युमुखीही पडले.
प्लेग हा काही शतकापूर्वी अत्यंत भयंकर असा
रोग मानला जायचा. सहाव्या शतकात जगात या
रोगाने १० कोटी बळी घेतले, तर १२४६ ते १६४५
पर्यंत २.५ कोटी बळी घेतले. १८९८ ते १९०८
या काळात भारतात प्लेगने दरवर्षी ५ लाखांच्यावर
लोक मृत्युमुखी पडत होते. नंतर हे प्रमाण खूप कमी
झाले. १९६६ नंतर तर १९९४ पर्यंत प्लेगचा एकही
रुग्ण भारतात आढळला नाही. सप्टेंबर १९९४
पासून मात्र ५००० हून जास्त रुग्ण सापडले.
यर्सिनीला पेस्टीज नावाच्या जिवाणूमुळे प्लेग
हा रोग होतो. प्लेग हा सामान्यपणे जंगली
उंदीर व तत्सम प्राण्यांपासून होणारा रोग आहे.
असे उंदीर भूकंप, पूर, युद्ध अशा आपत्तींच्या
काळात समाजजीवनाची घडी बिघडल्याने, वस्त्या
ओस पडल्याने गावांमध्ये येतात. त्यामुळे त्यांचा
व घरातील उंदरांचा संपर्क येतो व तेथील
घरात राहणार्‍या उंदरांमध्ये हा रोग पसरतो. या
रोगाचा प्रसार उंदरांमध्ये व उंदरांपासून माणसांमध्ये
पिसवांमुळे होतो. घाण असलेल्या जागी उंदराचे
वास्तव्य असते. त्यांच्या शरीरावर पिसवा असतात.
या पिसवा प्लेग रोग असलेल्या उंदराला चावून,
नंतर निरोगी माणसाला चावतात. त्यामुळे निरोगी
माणसाला प्लेग होतो. प्लेग होण्याचे मुख्य कारण हे
अस्वच्छता वा कमी दर्जाचे राहणीमान यात सापडते.
प्लेगचे गाठींचा प्लेग (ब्युबोनिक), फुफ्फुसाचा प्लेग
(न्यामोनिक) व रक्तातील प्लेग (सेप्टीसेमीक) असे
तीन प्रकार आहेत. पूर्वी प्लेगवर परिणामकारक
औषधे उपलब्ध नव्हती. त्यामुळे खूप लोक बळी
पडत. आज मात्र सेप्ट्रान, टेट्रासायलीन अशी
अनेक प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. प्रतिबंधक
लसही उपलब्ध आहे. त्यामुळे प्लेगला घाबरण्याचे
मुळीच कारण नाही. आजच्या काळात तो एक
सहजगत्या बरा होणारा रोग आहे. फक्त त्याचे निदान
लवकर व्हायला हवे. आपले घर-परिसर स्वच्छ
राखला, उंदरांचा नायनाट केला; तर प्लेगची भीती
बाळगण्याचे काहीच कारण उरणार नाही.