चावी बनवायला घरी आला अन्‌ दागिने आणि रोकड घेवून पळाला

0
54

तारकपूर परिसरातील घटना; चोरटा सीसीटीव्हीत झाला कैद नगर – मोटारसायकल ची चावी बनविण्यासाठी घरी

नगर – मोटारसायकल ची चावी बनविण्यासाठी घरी आलेल्या चावीवाल्याने हात चलाखी करत घरातील कपाटातून ८ तोळे सोन्याचे दागिने, ५० हजारांची रोकड असा सुमारे ३ लाख ७० हजारांचा ऐवज घेवून पोबारा केल्याची घटना गुरुवारी (दि.४) दुपारी १२ ते २ वाजेच्या दरम्यान तारकपूर परिसरातील इंदिरा कॉलनीत घडली. हा चोरटा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला असून पोलिस पथक त्याचा शोध घेत आहे. याबाबत किशोर हरीलाल कंत्रोड (वय ५५, रा. इंदिरा कॉलनी, तारकपूर) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कंत्रोड यांचे इंदिरा कॉलनीत किराणा दुकान आहे. गुरुवारी (दि.४) दुपारी १२ च्या सुमारास त्यांच्या कॉलनीत एक काळी पगडी घातलेला इसम चावी बनालो, चावी असे ओरडत आला. कंत्रोड यांनी त्याला हाक मारून घराजवळ बोलावले व मोटारसायकलची चावी बनवून दे असे ते म्हणाले. त्याने पिण्यासाठी पाणी मागितले. व एखादी कपाटाची मोठी चावी आहे का असे विचारले. कंत्रोड यांनी त्याला कपाटाची चावी आणून दिल्यावर त्याने त्या चावीवर हातोड्याने मारायला सुरुवात केली. कंत्रोड यांनी त्यास चावी खराब होईल असे सांगितले असता तो म्हणाला मी सर्व व्यवस्थित करून देतो असे म्हणाला. थोड्या वेळाने कंत्रोड यांनी त्याच्याकडून चावी घेत घरात जावून ती कपाटाला लावून पाहिली असता ती हातोड्याने ठोकल्यामुळे कपाटाच्या लॉक ला बसेना.

ही बाब त्यांनी बाहेर येवून त्या चावीवाल्या इसमाला सांगितली. त्यावर तो मी सर्व व्यवस्थित करून देतो असे म्हणत मला कपाट कुठे आहे, ते दाखवा असे म्हणाला. कंत्रोड यांनी त्यास घरात नेवून कपाट दाखवले. त्यावेळी त्याने तेथेच बराच वेळ थांबून खटपट करत कपाटाच्या लॉकला चावी बसवून कपाट दोन तीन वेळा उघडून बंद केले. या दरम्यान त्याने कंत्रोड व त्यांच्या कुटुंबियांची नजर चुकवून हात चलाखीने कपाटातील सुमारे ८ तोळे सोन्याचे दागिने, ५० हजारांची रोकड असा ३ लाख ७० हजारांचा ऐवज काढून घेतला व कंत्रोड यांना चावी व्यवस्थित झाली असल्याचे दाखवून तेथून घाई घाईने निघून गेला. तो घराबाहेर गेल्यावर कंत्रोड यांनी कपाटात पाहिले असता त्यांना दागिने व रोकड दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी व त्यांच्या मुलाने बाहेर जावून सर्वत्र त्या चावीवाल्याचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही. त्यानंतर त्यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी त्या अनोळखी चावीवाल्या इसमाविरुद्ध भा.दं.वि.कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदरचा चोरटा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला असून पोलिसांनी सदर फुटेज ताब्यात घेत त्याचा शोध सुरु केला आहे.