रस्त्यात थांबल्याच्या वादातून तरुणावर केले कुऱ्हाडीने वार

0
66

 

५ जणांवर जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

नगर – रस्त्यात उभे राहिल्याच्या वादातून ५ जणांनी दोघा भावांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व एकाच्या डोयात कुर्‍हाडीने वार करत त्याला जीवे मारण्याचा पर्यंत केल्याची घटना साई नगर, भिस्तबाग चौक, सावेडी येथे बुधवारी (दि.३) रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. या मारहाणीत दत्तात्रय शिवाजी रोकडे हा जखमी झालेला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत जखमी दत्तात्रय याचा भाऊ वैष्णव शिवाजी रोकडे (रा. गौरी शंकर हौसिंग सोसायटी, साई नगर, भिस्तबाग चौक, सावेडी) याने तोफखाना पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि.४) दुपारी फिर्याद दिली आहे. फिर्यादी वैष्णव व त्याचा भाऊ दत्तात्रय हे दोघे बुधवारी (दि.३) रात्री १० वाजण्याच्या सुमारास साई नगर परिसरात रस्त्यावर बोलत उभे असताना तेथे त्यांच्या घरामागे राहणारा सोनू जोशी आला. त्याने त्यांना रस्त्यात का थांबले अशी विचारणा केली.

त्यावेळी या भावांनी तुला जायला रस्ता आहे ना, तु जा असे म्हणाले. त्याचा राग येवून तो रागात तेथून गेला व थोड्या वेळात तो त्याचा भाऊ मोनू जोशी, अभी कर्डिले, सागर गाणार, अजय बाबर असे ५ जण तेथे आले व त्यांनी दोघा भावांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील सोनू जोशी याने दत्तात्रय रोकडे याच्या डोयात कुर्‍हाडीने वार करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी ५ जणांच्या विरुद्ध भा.दं. वि.कलम ३०७, ३२३, १४३, १४७, १४९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान दत्तात्रय व वैष्णव रोकडे या दोघा भावांना रस्त्यातून बाजूला व्हा असे म्हटल्याचा राग येवून त्यांनी सोनू जोशी व त्यांच्या घरातील एका महिलेला मारहाण करत विनयभंग केला असल्याची फिर्याद एका महिलेने दिली असून या फिर्यादी वरून पोलिसांनी दोघा भावांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.