केडगावच्या लंडन किड्‌स शाळेत वार्षिक बक्षीस वितरण

0
32

विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

नगर – केडगाव, शाहूनगर येथील लंडन किड्स प्री स्कूल मध्ये शैक्षणिक वर्षात कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात यश संपादन करणार्‍या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. राणीताई कोतकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोहिणी ठुबे, शाळेच्या प्राचार्य रुचिता जमदाडे, शिक्षक निशिगंधा गायकवाड, सुप्रिया मुळे, कल्याणी शिंदे, सपना साबळे, प्रतिभा साबळे आदींसह विद्यार्थी व पालक उपस्थित होते. प्रास्ताविकात प्राचार्या सौ. रुचिता जमदाडे म्हणाल्या की, इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देत असताना मुलांना आपल्या संस्कृतीचा विसर पडू नये, म्हणून शाळेत प्रत्येक सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करुन विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजवले जात असल्याचे सांगितले. तर शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमाची त्यांनी माहिती दिली.

राणीताई कोतकर म्हणाल्या की, लंडन किड्स शाळेने कमी कालावधीत अधिक दर्जेदार शिक्षण देऊन केडगावात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या शालेय परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, चित्रकला, फॅन्सी ड्रेस, हस्ताक्षर तसेच पालकांची रांगोळी स्पर्धा आदी स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. प्रमाणपत्र, शैक्षणिक साहित्य व स्मृतिचिन्ह देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शैक्षणिक वर्षाच्या शेवटी बक्षीस मिळाल्याने मुलांच्या चेहर्‍यावर हास्य फुलले होते.