मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
28

सिफीलीस हा रोग कसा होतो? त्यावर उपाय काय?

सिफीलीस हा एक लिंगसांसर्गिक रोग आहे.
ट्रेपोनेमा पॅलीडम नावाच्या जिवाणूंमुळे हा रोग
होतो. रोग झालेल्या व्यक्तीबरोबर शरीरसंबंध
ठेवल्यास १० दिवसांनंतर केव्हाही याची लक्षणे
दिसायला लागतात. या रोगाचे मुख्य लक्षण म्हणजे
पुरुषामध्ये शिश्नावर किंवा त्यावरच्या त्वचेखाली
आणि स्त्रियांमध्ये योनिमार्गात किंवा गर्भाशयाच्या
तोंडावर पुळी तयार होते. ही फुटून नंतर व्रण तयार
होतो. हा व्रण वेदनारहित असतो व तळाशी जाडसर
असतो. त्यानंतर जांघेत एका वा दोन्ही बाजूच्या
रसग्रंथी सुजतात. मात्र वेदना होत नाही. उपचार
न झाले तरी हा व्रण महिनाभरात दुरुस्त होतो. या
व्रणाला हात लावल्यास व नंतर हात डेटॉलने स्वच्छ
न केल्यास स्पर्श करणार्‍याला हा रोग होऊ शकतो.
गरमी व सिफीलीसच्या दुसर्‍या अवस्थेत अंगावर न
खाजणारे चट्टे येतात. शरीरात ठिकठिकाणी अवधाण
येते, तोंडात व्रण येतात. तिसर्‍या अवस्थेत मेंदू,
हृदय व हाडे यांवर या रोगाचा परिणाम दिसून येतो.
हृदयाच्या झडपा निकामी होतात, महारोहिणीला
फुगार येतो व ती कमकुवत होते. तसेच मेंदू व
मज्जासंस्था खराब होतात. स्त्रिला सिफीलीस झाला
असेल, तर वारंवार गर्भपात होतात व मूल जन्माला
आलेच, तर त्यात व्यंगे असतात.
सिफीलीसच्या निदानासाठी प्राथमिक
अवस्थांमध्ये जंतूंचा शोध घेता येतो. त्यानंतर मात्र
या तपासणी शरीराने या जंतूंच्या विरोधात तयार
केलेल्या प्रतिद्रव्यांची मोजणी केली जाते व रोगाचे
निदान केले जाते.
या आजारावर पेनिसिलीनची इंजेशने फारच
उपयुक्त ठरतात. दररोज एक असे १० ते १५
दिवस पेलिसिलीनची इंजेशने वा एकच मोठा डोस
दिल्यास रोग बरा होतो. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे
पतीस सिफीलीस असेल, तर पत्नीलाही उपचार
द्यावे लागतात. दुसरे म्हणजे सिफीलीसवर इतर
कोणतेही उपचार करू नयेत. काही समाजात असे
गैरसमज आहेत की, कुमारिकांशी वा प्राण्यांशी
शरीरसंबंध ठेवल्याने हा रोग बरा होतो. ही गोष्ट
अत्यंत चुकीची आहे. उलट त्यामुळे रोगप्रसार आणि
विकृती निर्माण होतात. गुंतागुंतीचे संसर्ग होऊन
मृत्यू येतो.
नैतिकता ठेवून वर्तन करणार्‍याला
सिफीलीससारखा रोग होणारच नाही. त्यामुळे केवळ
एकमेकांशीच प्रामाणिकपणे शरीरसंबंध ठेवणार्‍या
पती-पत्नींना हा रोग कधीच होऊ शकणार नाही.