शासकीय कार्यालयात अल्पवयीन मुले कामास ठेवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा

0
57

अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन युवा सेनेचे उपोषण सुरु

नगर – शहरातील नगररचना व मूल्य निर्धारण विभाग कार्यालयात अल्पवयीन मुले कामास ठेवल्याबद्दल बालकामगार प्रतिबंध कायदा १९८६ नुसार बेजबाबदार अधिकारी यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने मंगळवारी (दि.२ एप्रिल) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. जिल्हा संघटक मेहेर कांबळे व किरण जाधव यांनी कारवाई होत नाही, तो पर्यंत उपोषण सुरु ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे. सावेडी येथील सावित्रीबाई फुले संकुलात नगररचना व मूल्य निर्धारण विभागात अतिमहत्त्वाचे दस्त आहेत. या शासकीय कार्यालयात बालमजूर कामाला ठेवल्याची बाब निदर्शनास आली असून, अशा पध्दतीने शासकीय कार्यालयात बालमजूर कामाला ठेवणे म्हणजे एक प्रकारे गंभीर बाब आहे. २० मार्च रोजी सहाय्यक संचालक व नगररचनाकार हे प्रमुख शासकीय अधिकारी कार्यालयात असताना बालमजूर शासकीय कार्यालयात काम करत होते. एक प्रकारे सदर अधिकार्‍यांच्या अनुमतीनेच हे बालकामगार काम करत होते.

खासगी अथवा शासकीय कार्यालयात बालकामगार ठेवणे हा गुन्हा असून, गंभीर बाब आहे. या प्रकरणाचे संपूर्ण व्हिडिओ चित्रीकरण पुरावा म्हणून उपलब्ध आहे. तसेच या कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आलेले आहे. १७ ते २० मार्च दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास बालकामगार सदर कार्यालयात काम करत असल्याचे उघडकीस येणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. नगररचना व मूल्य निर्धारण विभाग कार्यालयात अधिकार्‍यांच्या उपस्थितीमध्ये बालकामगारांकडून काम सुरु होते. एक प्रकारे त्यांचीच याला अनुमती असल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी संबंधित कार्यालयाचे नगररचनाकार व सहाय्यक संचालक या अधिकार्‍यांवर बालकाम गार प्रतिबंध कायदा १९८६ नुसार बेजबाबदार अधिकारी यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.