सावेडीत ‘त्या’ कॅफेवर पोलिसांचा पुन्हा छापा

0
69

नगर – शाळा, कॉलेजच्या युवक-युवतींना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणार्या सावेडीतील स्टेला कॅफेवर (डौले हॉस्पिटल जवळील) तोफखाना पोलिसांनी मंगळवारी (दि.२) सायंकाळी छापा टाकून कारवाई केली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, शहरातील कॅफेवर वारंवार कारवाई करून देखील ते पुन्हा सुरू होत असल्याचे समोर आले आहे. नगर मनमाड रस्त्यावर सावेडी परिसरात डौले हॉस्पिटल जवळ हा स्टेला कॅफे आहे. या कॅफेवर पोलिसांनी या पूर्वीही कारवाई केलेली आहे. परंतु तो पुन्हा सुरु झाला असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली.

युवक-युवतींना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा

या माहितीच्या आधारे तेथे मंगळवारी (दि.२) सायंकाळी ६.१० च्या सुमारास छापा टाकला असता कॅफेचालकाकडे कॉफी शॉपचा परवाना नसताना स्टेला कॉफी शॉप बोर्ड लावून कुठलाही कॉफी हा पेय तसेच इतर कुठलेही खाद्य पदार्थ विक्रीसाठी ठेवलेले आढळले नाहीत. आतमध्ये लाकडी कंपार्टमेंट बनवून त्यास बाहेरुन पडदे लावुन आतमध्ये बसण्यासाठी सोफे ठेवून मुला मुलींना बसण्यासाठी व अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देताना मिळून आला. त्यामुळे कॅफेचालक फरहान सर्फराज शेख (रा. हनुमान नगर, केडगाव) याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२९,१३१ (क) (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.