गॉडविन कप ९ अ साइड फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ

0
22

भुईकोट किल्ल्याच्या मैदानात रंगतोय फुटबॉलचा थरार

नगर – शहरातील दिवंगत फुटबॉल खेळाडू गॉडविन डिक यांचा स्मरणार्थ फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गॉडविन कप ९ अ साइड फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते झाले. यावेळी उपाध्यक्ष खालिद सय्यद, खजिनदार जोगासिंह मिनास, सहसचिव विटर जोसेफ, ऋषपालसिंग परमार, जेव्हिअर स्वामी, राजेश अँथनी, जॉय जोसेफ, प्रदिप जाधव, राजू पाटोळे आदी उपस्थित होते. स्पर्धेच्या प्रारंभी गॉडविन डिक यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन उपस्थित पाहुणे व खेळाडूंनी त्यांना श्रध्दांजली वाहिली. श्री. फिरोदिया यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. प्रास्ताविकात विटर जोसेफ म्हणाले की, गॉडविन डिक यांनी आपल्या आयुष्यात अनेक फुटबॉलपटू घडविण्याचे काम केले. त्यांच्या स्मरणार्थ नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे स्पष्ट केले. जेव्हिअर स्वामी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, शहरात फुटबॉल खेळ रुजविण्यासाठी गॉडविन डिक यांचे मोलाचे योगदान राहिले. त्यांच्यामुळे या खेळाला चालना मिळाली असल्याचे स्पष्ट करुन त्यांनी स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

प्रदिप जाधव यांनी स्व. गॉडविन डिक सरांनी खेळाडूवृत्तीने जीवन जगले. फुटबॉलसाठी त्यांचे अतुलनीय समर्पण सर्वांना प्रेरणा देणारा असल्याचे सांगितले. भुईकोट किल्ला येथील मैदानात फुटबॉल स्पर्धेच्या थरारला प्रारंभ झाले असून, सहा दिवसीय फुटबॉल स्पर्धा रंगणार आहे. यामध्ये शहरातील १२ फुटबॉल संघांनी सहभाग नोंदवला आहे. पहिला सामना आर्ककॉन विरुध्द बाटा एफसी यांच्यात झाला. यामध्ये आर्ककॉनने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन ३-१ गुणांनी स्कोअरलाइनसह विजय मिळवला. ही स्पर्धा डिक कुटुंबीय आणि अहदमनगर डिस्ट्रीट फुटबॉल असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, नॉकआऊट पध्दतीने सर्व सामने होणार आहे. दररोज २ सामन्यांचे नियोजन करण्यात आले असून, अंतिम सामना ७ एप्रिल रोजी रंगणार आहे. यामधील विजेत्या संघास ९ हजार रुपये रोख व चषक, उपविजयी संघास ५ हजार रुपये रोख व चषक प्रदान केले जाणार आहे.