अवैधरित्या रिफिलिंग करताना गॅस टाक्यांचा भीषण स्फोट; २ गंभीर जखमी; शेडचे नुकसान

0
26

नगर – एका पोल्ट्री शेडमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग करताना सोमवारी (दि. १) रात्री ८.१५ च्या सुमारास गॅस टायांचा भीषण स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या पोल्ट्री शेडच्या जवळच गॅस गोडावून असून त्याची संरक्षक भिंत स्फोटात पडली. मात्र तेथील गॅस टायांपर्यंत आग न पोहचल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. कर्जत शहराजवळ असणार्‍या बर्गेवाडी रस्त्यावर ही घटना घडली. या स्फोट प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अमित बर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अवैध गॅस रिफिलिंग करणारे सचिन उत्तम लोंढे (रा. बर्गेवाडी, कर्जत) व वैभव निकत (रा.आंबीजळगाव, ता. कर्जत) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बर्गेवाडी शिवारामध्ये सचिन लोंढे याचा पोल्ट्री फार्म आहे. त्या ठिकाणी गॅसच्या टायांचा स्फोट झाला. यामध्ये बारा कमर्शियल मोठ्या जळालेल्या गॅस टाया, दोन छोट्या गॅस टाया, पाच गॅस सिलेंडर जळून तुटलेल्या अवस्थेमध्ये, तसेच पोल्ट्रीच्या बाहेर भरलेल्या एच.पी. कंपनीच्या गॅस टाया आढळून आल्या.

याशिवाय जळालेल्या अवस्थेतील ४ इलेट्रिक मोटार, वेगवेगळ्या गॅस टाकीतून नोझल व पाईप यांच्या साह्याने गॅस काढून घेणे, तसेच इतर गॅस टाकीमध्ये भरणे, या प्रकारचे काम करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य जळालेल्या अवस्थेत आढळून आले. तसेच, एक जळालेला स्टोव्ह, जळालेले संसारोपयोगी भांडी व साहित्य जळालेला गहू, पूर्णपणे जळून सांगाडा झालेली स्कुटी गाडी व एक सायकल आढळली आहे. या स्फोटामुळे परिसरात हादरे बसले तर आगीचे आणि धुराचे लोळ पसरले होते. त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. या घटनेत आरोपी असलेले दोघे गंभीर जखमी झालेले असून त्यांच्यावर नगरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या आरोपींनी कुटुंबातील सदस्य व परिसरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणारी कृती केली आहे. यामुळे याप्रकरणी या दोघांविरुद्ध भा.दं.वि. कलम ४३६, २८६, ३३७, ३३८, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.