डोळ्यात मिरचीपूड टाकून भरदिवसा महिलेच्या गळ्यातील दागिने पळविले

0
33

नगर – दुकानात जावून दुकानदार महिलेला फ्रुटी मागत तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न करणार्‍याला महिलेने पकडल्यानंतर तिच्या डोळ्यात मिरचीपूड फेकत दागिने पळवून नेल्याची घटना बोल्हेगाव उपनगरात १ मार्चला दुपारी ३ वा.च्या सुमारास घडली. याबाबत मीरा लालासाहेब पाचपुते (रा. आदेश लॉन शेजारी, बोल्हेगाव) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे बोल्हेगाव येथे कपड्याचे व इतर साहित्याचे दुकान आहे. सोमवारी दुपारी त्या दुकानात असताना एका मोपेड वर एक अनोळखी तरुण आला. त्याने दुकानात येवून फिर्यादी पाचपुते यांना फ्रुटी आहे का विचारले. त्यांनी हो म्हणत फ्रीज मध्ये असलेली फ्रुटी काढण्यासाठी त्या खाली वाकल्या असता त्या तरुणाने त्यांच्या गळ्यातील दीड तोळा वजनाचे सोन्याचे मिनीगंठण हिसकावले. हे लक्षात येताच पाचपुते यांनी त्या तरुणाचा हात पकडला आणि आरडाओरडा करायला सुरुवात केली.

तेवढ्यात त्याने खिशातून मिरचीपूड काढत ती फिर्यादी पाचपुते यांच्या डोळ्यात फेकली आणि सोन्याचे मिनीगंठण तेथून तो मोपेड वर बसून पळून गेला. फिर्यादी पाचपुते यांनी केलेला आरडाओरडा ऐकून तेथे नागरिक जमा झाले मात्र तो पर्यंत चोरटा पसार झाला होता. त्यानंतर पाचपुते यांनी तोफखाना पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळताच नगर शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अमोल भारती, तोफखान्याचे पो.नि. आनंद कोकरे यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. याबाबत अनोळखी चोरट्याविरुद्ध भा.दं.वि.कलम ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे करीत आहेत.