क्रेडीट कार्डद्वारे नगरच्या व्यावसायिकाची १ लाख ८० हजाराची ऑनलाईन फसवणूक

0
85

नगर – अज्ञात सायबर भामट्याने व्यावसायिकाच्या क्रेडीट कार्डद्वारे १ लाख ८० हजारांची रक्कम परस्पर काढून घेत ऑनलाईन आर्थिक फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अनोळखी इसमाविरुद्ध कोतवाली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मिलिंद चंद्रकांत गांधी (रा.स्टेशन रोड, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे जुन्या बस स्थानकासमोरील उज्ज्वलनगर येथे दुकान आहे. त्यांच्या कडे ए यु बँकेचे क्रेडीट कार्ड आहे. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या कार्ड मधून इझी पे सर्व्हिस, प्रा. लि. या द्वारे १ लाख ७० हजार आणि रिटेल एस पी दिल्ली या सर्व्हर द्वारे १० हजार असे एकूण १ लाख ८० हजारांची रक्कम काढून घेतली. ही बाब लक्षात आल्यावर गांधी यांनी बरीच चौकशी केली मात्र क्रेडीट कार्ड द्वारे कोणी आणि कशी ही रक्कम काढून घेतली. याची माहिती त्यांना मिळू शकली नाही. त्यानंतर त्यांनी सोमवारी (दि१) दुपारी कोतवाली पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध भा.दं.वि. कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.