पणन महासंघास पुन्हा नफ्यात आणण्यासाठी योगदान देणार : चेअरमन दत्तात्रय पानसरे

0
26

नगर जिल्हा पणन कार्यालयाच्यावतीने सत्कार

नगर – महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या चेअरमन पदाची जबाबदारी माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकर्‍याच्या मुलाला देवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्यावर मोठा विश्वास व्यक्त केला आहे. पणन महासंघाची स्थापना ज्या उद्देशाने करण्यात आली आहे तो उद्देश मी प्रत्यक्षात आणण्यास प्राधान्य देणार आहे. नऊ वर्षाच्या प्रशासक राज संपल्यानंतर आता नव्या जोमाने काम करून या महासंघास नफ्यात आणण्यासाठी चेअरमन म्हणून योगदान देणार आहे. जिल्हा बँकेचा संचालक म्हणून केलेल्या कामपेक्षा अधिक काम या पदाच्या माध्यमातून शेतकर्‍यांसाठी करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हात अधिक बळकट करणार आहे. पणन महासंघाचा जास्तीत जास्त शेतकर्‍यांना कसा फायदा होईल हे मी पहाणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे नूतन चेअरमन दत्तात्रय पानसरे यांनी केले. महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या चेअरमन पदाची निवडणूक गुरवारी मुंबई येथे झाली. या निवडणुकीत श्रीगोंदा तालुयाचे दत्तात्रय पानसरे यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

याबद्दल नगर जिल्हा पणन कार्यालयात दत्तात्रय पानसरे यांचा सत्कार जिल्हा पणन अधिकारी श्रीकांत आभाळे यांनी करून अभिनंदन केले. यावेळी महासंघाचे छत्रपती संभाजीनगरचे संचालक पांडूरंग घुगे, महाराष्ट्र बाजार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब नाहटा, उखलगावचे सरपंच सतीश काळे आदींसह जिल्हा पणन कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दत्तात्रय पानसरे पुढे म्हणाले, शेतकर्‍यांच्या उत्पादनाला योग्य हमी भाव मिळण्यासाठी तसेच केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहचवण्याचे महत्वाचे काम या महासंघाचे आहे. मात्र गेल्या ९ वर्षांच्या प्रशासक राजमुळे या सहकारी पणन महासंघाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पश्चिम व उत्तर महाराष्ट्राच्या मानाने पणन महासंघाचे विदर्भ व कोकणात मोठे काम आहे. त्यामुळे आपल्या भागात या महामंडळाचे काम वाढवून शेतकर्‍यांना अधिकाधिक फायदा करून देणार आहे.

पांडुरंग घुगे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने तसेच पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या शुभेच्छांनी दत्तात्रय पानसरे यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली आहे. अतिशय डबघाईला आलेली संस्था म्हणून या संस्थेची पूर्ण राज्यात ओळख निर्माण झालेली आहे. त्यामुळे या संस्थेला पुनर्जीवन मिळून पुन्हा सोन्याचे दिवस आणण्यासाठी दत्तात्रय पानसरे यांच्यासारख्या चांगले काम करणार्‍या व्यक्तीकडे चेअरमन पदाची धुरा सोपवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी योग्य निर्णय घेतला आहे. आता सर्वसामान्य तळागाळातील शेतकर्‍यांच्या समस्या सुटल्या शिवाय राहणार नाही. प्रास्ताविकात पणन अधिकारी श्रीकांत आभाळे यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या चेअरमन पदाची जबाबदारी नगरचे दत्तात्रय पानसरे यांना मिळाल्याचा आनंद जिल्हा पणन कार्यालयास झाला आहे. त्यांच्या कामाचा फायदा नक्कीच जिल्हा कार्यालयास होईल, असे त्यांचे सांगून अभिनंदन केले.