ईदगाह मैदान व प्रत्येक मशिदीसमोर स्वच्छता करुन औषध फवारणी करावी

0
52

ईदच्या सकाळी विद्युत पुरवठा खंडित करु नये, महावितरणकडे मागणी; आय लव्ह अहमदनगर फाऊंडेशनचे निवेदन

नगर – रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाज बांधवांसाठी ईदगाह मैदान येथे स्वच्छता, प्रत्येक मशिदीसमोर स्वच्छता करुन औषध फवारणी करणे तसेच ईदच्या आदल्यादिवशी एक तास अधिकचा पाणीपुरवठा करण्याबाबत आय लव्ह अहमदनगर फाऊंडेशनच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांची भेट घेवून निवेदन दिले. आयुक्त जावळे यांनी स्वछतेबाबत तातडीने सबंधित विभागातील अधिकार्‍यांना सूचना केल्या. तसेच ईदच्या दिवशी सकाळी नमाजच्या वेळेत कोणत्याही भागातील विद्युत पुरवठा खंडित करु नये, याबाबतचे निवेदन विद्युत महावितरण कार्यालयास देण्यात आले. यावेळी साहेबान जहागीरदार, मुजाहिद सय्यद, रईस उर्फ मुज्जू भाई, खालिद शेख, शेरू शेख, शाहनवाज शेख, अब्दुल खोकर, मारुफ सय्यद, शाहरुख शेख, अकरम शेख, फैजान शेख, हुजेफा खान, अकिल शेख आदी उपस्थित होते. मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरु असून, चंद्र दर्शन झाल्यानंतर ईद ११ किंवा १२ एप्रिल रोजी साजरी होण्याची शयता आहे. दिनदर्शिकेप्रमाणे ईद १२ एप्रिलला जाहीर करण्यात आलेली आहे.

ईदच्या नमाजसाठी ईदगाह मैदान येथे शहरातील हजारो मुस्लिम बांधव सामुदायिक नमाजसाठी येतात. या ईदगाह मैदान जवळील रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने या भागात मोठी कचराकुंडी निर्माण होवून परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये नमाजसाठी येणार्‍या मुस्लिम नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावण्याची शयता आहे. याबाबत मनपा प्रशासनाने तातडीने या भागातील कचर्‍याची साफसफाई करुन पूर्णत: परिसर स्वच्छ करावा. तर ईदगाह मैदान या धार्मिक नमाज पठणाच्या ठिकाणी कचरा टाकणार्‍यांवर मनपा प्रशासनाने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. शहरातील प्रत्येक मशिदीत ईदच्या दिवशी सकाळी ७ वाजल्यापासून नमाज पठण होत असते. तर नमाज पठणनंतर मुस्लिम बांधव शहरातील कब्रस्तान व दर्गाच्या ठिकाणी दर्शनास जातात.

मनपा प्रशासनाने मशिद व दर्गा परिसरात स्वच्छता व औषध फवारणीबाबत सफाई कर्मचार्‍यांना सूचना करण्याचे निवेदनात म्हंटले आहे. शहरात दिवसाआड पाणी सुटत आहे. तर काही भागात पाण्याची मोठी समस्या आहे. ईदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना जास्त पाण्याची गरज भासत असते. ईदच्या आदल्यादिवशी मनपा प्रशासनाने मुस्लिम बहुल भागात एक तास अधिक पाणी देण्याची व्यवस्था केल्यास नागरिकांना चांगल्या पध्दतीने ईद साजरी करता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मागील काही वर्षापासून ईदच्या दिवशी सकाळी विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने मुस्लिम बांधवांची गैरसोय होत आहे. नमाजच्या वेळेस लाईट गेल्यास व्यत्यय निर्माण होतो. विद्युत महावितरणने खबरदारी घेवून ईदच्या दिवशी सकाळी नमाजच्या वेळेत कोणत्याही भागातील विद्युत पुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घेण्याची मागणी विद्युत महावितरण कार्यालयाकडे करण्यात आली आहे.