जैन तीर्थंकरांच्या पुरातन मूर्तींचा ऑनलाईन लिलाव सरकारने थांबवावा अन्यथा आंदोलन : सुभाष मुथा

0
38

मूर्ती तस्करी करून विक्री करणे हे गुन्हेगारी कृत्य, जैन धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार : सुभाष मुथा 

नगर – हजारो वर्षांची परंपरा असलेल्या जैन धर्मात तीर्थंकारांवर भाविकांची नितांत श्रध्दा आहे. हजारो वर्षांपूर्वीच्या जैन तीर्थंकरांच्या मूर्ती या अनमोल ठेवा आहेत. पण सध्या या पुरातन मूर्ती सहजरित्या लिलावात उपलब्ध होत आहेत. येत्या १५ एप्रिल रोजी टॉडीवाला ऑशन या ऑनलाईन साईटवर तीर्थंकारांच्या १५ मूर्तींचा लिलाव आयोजित करण्यात आला आहे. हा सरळसरळ जैन श्रध्दास्थानांचा अवमान असून मुळात या पुरातन मूर्ती लिलावासाठी उपलब्ध झाल्या कशा, याची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. सुमारे एक हजार वर्षे जुन्या या मूर्ती कोणत्या मार्गाने लिलावासाठी उपलब्ध झाल्या याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी नगरमधील कापडबाजार जैन मंदिरचे अध्यक्ष सुभाष मुथा, दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष महावीर बडजाते, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य वसंत लोढा यांनी केली आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलिस आयुक्तांना निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत.

सुभाष मुथा यांनी म्हटले आहे की, जैन तीर्थंकरांनी हजारो वर्षांपूर्वी जैन धर्माचे तत्वज्ञान, अहिंसेचा संदेश जगाला दिला. या तीर्थंकरांच्या पुरातन मूर्ती योग्य पध्दतीने जतन होणे आवश्यक आहे. या मूर्तींवर पहिला हक्क जैन समाजाचा आहे. मात्र या पुरातन मूर्ती खासगी स्तरावर लिलावात येत असल्याचा प्रकार धक्कादायक आणि धार्मिक भावना दुखावणारा आहे. या मूर्तींचे पुरातत्व विभागाकडून जतन संवर्धन होणे आवश्यक आहे. असे असताना नेमया कोणत्या तस्करीतून या मूर्ती लिलावात येत आहेत याचा तपास होणे गरजेचे आहे. या प्रकारामुळे देशभरातील जैन समाजात संतापाचे वातावरण तयार झाले आहे. जैन धर्मियांच्या श्रध्दास्थानांचा असा लिलाव होणे, त्या मूर्ती चोरट्या पध्दतीने लिलावात आणणे चुकीचे आहे. केंद्र व राज्य सरकारने या प्रकाराची सखोल चौकशी करून मूर्ती तस्करांवर कारवाई केली पाहिजे. तसेच १५ एप्रिल रोजी होणारा तीर्थंकरांच्या मूर्तींचा लिलाव तातडीने थांबवून सदर मूर्ती शासनाने ताब्यात घ्याव्यात. अन्यथा जैन समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा सुभाष मुथा यांनी दिला आहे.