प्लीहा म्हणजे काय?

0
57

प्लीहा म्हणजे काय?

प्लीहा हे इंद्रिय आपल्या शरीरात डाव्या बाजूला असते. छातीच्या पिंजर्‍यामध्ये छाती व पोट यांमध्ये असलेल्या डायफॅ्रम या स्नायूच्या खाली प्लीहा असते. श्वसनाबरोबर प्लीहा वरखाली होत असते. शरीरातील रोगप्रतिबंधक शक्तीसाठी एखाद्या लसिकाग्रंथीप्रमाणे प्लीहा कार्य करते. शरीरात कोणताही ‘परकीय’ पदार्थ शिरला की, प्लीहेमध्ये टी व बी प्रकारच्या लिम्फोसाईट्स (पांढर्‍या रक्तपेशींचा एक प्रकार) तयार होण्याचे प्रमाण वाढते. या पेशी रोगप्रतिकारशक्तीसाठी कारणीभूत असतात. ‘बी’ प्रकारच्या लिम्फोसाईट्स परकीय पदार्थ वा अँटीजेनच्या विरुद्ध प्रतिद्रव्ये (अँटीबॉडीज) तयार करतात, तर ‘टी’ प्रकारच्या पेशी अँटीजेन बाबत ‘स्मरणशक्ती’ निर्माण करतात. प्लीहेचे दुसरे महत्त्वाचे कार्य म्हणजे दुखापत झालेल्या, निरुपयोगी झालेल्या रक्तपेशींचा नाश करणे. याचबरोबर लाल रक्तपेशीतील हिवतापाच्या जंतूंना मारण्याचे कामही प्लीहेतील पेशी करतात. त्यामुळेच हिवतापात प्लीहेचा आकार वाढलेला असतो. प्लीहा रक्तातील एकूण रक्तबिंबीकांपैकी (प्लॅटलेट) ३० ते ४० टक्के रक्तबिंबीका गाळून साठवून ठेवते. गर्भावस्थेत ५ व्या महिन्यापासून मूल जन्माला येईपर्यंत प्लीहेमध्ये रक्तनिर्मितीचे कार्य होत असते. मूल जन्माला आल्यानंतर मात्र हे कार्य थांबते. कधीकधी काही रोगांमुळे प्लीहा लाल रक्तपेशींचा खूपच जास्त प्रमाणात नाश करू लागते. त्यामुळे प्लीहेचा आकार वाढतोच, पण त्याबरोबरच अ‍ॅनेमिया या रक्तपांढरीही होते. अशावेळी किंवा प्लीहेमध्ये कर्करोग झाल्यास प्लीहा शस्त्रक्रिया करून काढून टाकावी लागते.