नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी तेजी

0
36

सेन्सेस आणि निफ्टीने सर्वकालीन उच्चांक गाठत केला नवीन विक्रम 

मुंबई – नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (दि.१ एप्रिल) शेअर बाजाराने जोरदार सुरुवात केली असून देशांतर्गत शेअर बाजाराने मोठ्या तेजीने ओपनिंग केली. सकाळी शेअर बाजाराने उघडताच ७४,१०१ अंकांचा उच्चांक गाठला. बाजार उघडल्यानंतर २० मिनिटांच्या आत सेन्सेस आणि निफ्टीने नवीन विक्रम केला आणि या दोन्ही निर्देशांकांनी सर्वकालीन उच्चांक गाठला. शेअर बाजारासाठी नवीन आर्थिक वर्षाची शुभ सुरुवात झाली आणि बाजार उघडल्यानंतर लगेचच सेन्सेस आणि निफ्टीने सर्वकालीन उच्च विक्रमी पातळी ओलांडून एक नवीन ऐतिहासिक पातळी गाठली. निफ्टीने २२,५२९.९५ अंकांचा नवीन विक्रमी उच्चांक गाठला तर, सेन्सेस ७४,२५४.६२ अंकांच्या नव्या विक्रमी उच्चांकांवर पोहोचला आहे.

स्टॉक मार्केटची दमदार ओपनिंग

सेन्सेस ३१७.२७ अंक वाढीसह ७३,९६८ अंकांवर झाली तर निफ्टी १२८.१० अंकांच्या वाढीसह २२,४५५ अंकाच्या पातळीवर उघडला. सेन्सेसने बाजारात उघडताच ७४,२०८ अंकांच्या उच्च पातळीवर उडी घेतली आणि ५५७ अंकांची मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. तर सेन्सेसमधील ३० शेअर्सपैकी फक्त दोन शेअर्स घसरले आणि २८ शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत. सेन्सेसमध्ये सूचिबद्ध सर्वाधिक जेएसडब्ल्यू स्टील २% आणि टाटा स्टील १.७० टक्क्यांनी वधारला असून कोटक बँक १.५५% आणि एचडीएफसी बँक १.२५%, बजाज फिनसर्व्ह १.१५ टक्के आणि एशियन पेंट्स १.११ टक्क्यांनी वधारले आहेत. त्याचवेळी, आज निफ्टी देखील त्याच्या सर्वोच्च स्तरावर व्यवहार करत असून निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी ४८ शेअर्स वाढीसह आणि फक्त दोन शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, श्री राम फायनान्स, अपोलो हॉस्पिटल्स आणि एल अँड टी यांचे शेअर्स टॉप गेनर्समध्ये होते.

टेक शेअर्सही सुसाट

दुसरीकडे, सकाळच्या सत्रात टेक कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी दिसून येत आहे. एकीकडे इन्फोसिसचे शेअर १.०२% वाढून १,५१३.३५ रुपयांवर व्यवहार करत आहेत. याशिवाय टीसीएस शेअर ०.६७% वाढीसह ३,९०२.१० रुपये आणि विप्रो लिमिटेड शेअर ०.७४% वाढीसह ४८३.६५ रुपयांवर व्यवहार करत आहे.