बाजारपेठेतील दुकानांसमोर सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे, घाणीचे साम्राज्य

0
62

प्रशासन-ठेकेदार संस्थेचा सावळा गोंधळ सुरूच, व्यापारी त्रस्त

नगर – महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात सावळागोंधळ सुरू असून, कोणाचाच कोणाला पायपोस राहिला नसल्याचे चित्र आहे. प्रशासन आणि ठेकेदार संस्थेच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरातील बाजारपेठेत कचर्‍याचे ढिगारे साचत असून, सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. संकलित केलेला कचरा दुकानांसमोर टाकला जात असून, तो वेळेवर उचलला जात नसल्याने व्यापारी-व्यावसायिकांना दुपारपर्यंत दुकाने उघडणे कठीण झाले आहे. बाजारपेठेत साचलेल्या या कचर्‍याच्या ढिगार्‍यांमध्ये प्लॅस्टीक, मल, मूत्र आणि मांसाचे तुकडे असल्याने परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरत असल्याने दुकाने उघडावी की नाही? हे आता महापालिकेच्या अधिकार्‍यांनीच एकदा स्पष्ट करावे, अशी मागणी व्यापार्‍यांनी केली आहे. महापालिकेच्या सफाई कामगारांकडून सकाळच्यावेळी दैनंदिन साफसफाई केली जाते. या साफसफाईत सर्व कचरा जमा करून तो एका ठिकाणी एकत्र केला जातो. त्यानंतर ठेकेदार संस्थेकडून टॅ्रटरच्या माध्यमातून कचर्‍याचे ढिगारे उचलले जातात. मात्र मागील काही दिवसांपासून कचरा उचलण्याच्या कामात विस्कळीतपणा आला आहे. दुकानांसमोर जमा केलेले कचर्‍याचे ढिगारे दुपारपर्यंत उचलले जात नाहीत, त्यामुळे या ढिगार्‍यावरून वाहने जाऊन, जनावरे फिरून तो रस्त्यावर पसरला जातो. त्यातून बाजारपेठेतील रस्त्यांवर अस्वच्छता पसरते तसेच दुर्गंधीही सुटते. कचरा वेळेत उचलला जात नसल्याने सकाळी उघडणारी दुकाने व्यापार्‍यांना दुपारपर्यंत उघडता येत नाहीत. त्याचा परिणाम ग्राहक आणि व्यावसायिकांवरही होत आहे. कचरा वाहतूक करणार्‍या वाहनचालकांना याबाबत वारंवार सांगूनही ते व्यापारी, नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असून, त्यांच्या मनमर्जीप्रमाणे कचरा उचलण्यास येतात.

…तर सर्व कचरा स्वखर्चाने उचलून आयुक्तांच्या दालनासमोर टाकणार

बाजारपेठेतील कचर्‍याच्या गंभीर प्रश्नांबाबत व्यापारी आक्रमक झाले आहेत. बाजारपेठेत जमा केल्या जाणार्‍या कचर्‍याबाबत योग्य नियोजन करून तो वेळेवर उचलला जावा अन्यथा सर्व कचरा उचलून तो स्वखर्चाने महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर टाकण्याचा इशारा व्यापार्‍यांनी दिला आहे. यासंदर्भात एम.जी. रोड व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी आयुक्तांना निवेदन दिले असून, त्यात म्हटले आहे की, सध्या कापड बाजार येथे स्थानिक रहिवासी दुकानांसमोर कचरा टाकत आहेत. आम्ही वेळोवेळी येथील स्थानिक रहिवाश्यांना व कचरा गाडीवरील कर्मचारी यांना विनंती केली तसेच महानगरपालिकेत तक्रार केली मात्र काही उपयोग होत नाही.

एम.जी. रोड कापड बाजार येथील गांधी टॉईज दुकानासमोर एम.एस. ई.बी. पोल शेजारी तसेच इतर दुकानासमोर येथील स्थानिक रहिवासी कचरा टाकत आहेत. येथील कर्मचारी सर्व कचरा गोळा करून आमच्या दुकानासमोर टाकत आहेत. हा कचरा गाडीत भरत आहेत. घरचे खरकटे तसेच नॉनव्हेज, उरलेले पदार्थ, मांसाचे तुकडे येथे टाकत आहेत. त्यामुळे येथे प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. दुकानात बसणे कठीण झाले आहे. वेळोवेळी विनंती करून थकलो आहोत. येथील कचर्‍याचा त्वरित बंदोबस्त करावा. कचरा टाकणार्‍या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करावी व रोज कचरा गोळा करणार्‍या घंटागाडी सकाळी १० च्या आत येथे पाठवाव्यात. एम.जी. रोडवर पडलेला कचरा गोळा करावा, झाडू मारावा. वेगवेगळे कर भरत असूनदेखील व्यापार्‍यांना महापालिका मुलभूत सेवा देत नसेल तर सर्व कचरा गोळा करून आयुक्तांच्या दालनासमोर स्वखर्चाने टाकू, असा इशारा देणारे निवेदन रवि गांधी व विष्णू बल्लाळ यांनी दिले आहे.