एकविरा चौकात ३ ठिकाणी घरफोड्या

0
29

नगर – सावेडी उपनगरात असलेल्या पाईपलाईन रोडवरील एकविरा चौक परिसरात एकाच इमारतीतील ३ घरे चोरट्यांनी फोडली आहेत. त्या पैकी एका घरातून ६ हजारांची रोकड पळविली तर २ ठिकाणी चोरट्यांच्या हाती काहीही मौल्यवान ऐवज हाती लागला नाही. शनिवारी (दि.३०) सायंकाळी ६.३० ते रात्री ११.४५ या कालावधीत या चोर्‍या झाल्या आहेत. याबाबत विजय रंगनाथ रावभट (रा. साईदीप नगर, एकविरा चौक, पाईपलाईन रोड) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीचे गज कापून तसेच सेफ्टी डोअर तोडून घरात प्रवेश करत त्यांच्या मुलीचा मनी बँकेचा डब्बा तोडून त्यातील ६ हजारांची रोकड चोरून नेली. त्यानंतर त्यांच्या शेजारी असलेले डॉ. किरण रामकृष्ण गोरे व ज्ञानदेव तुकाराम चेमटे यांच्या घरांचेही सेफ्टी डोअर तोडून घरात प्रवेश करत सर्वत्र उचकापाचक करत चोरीचा प्रयत्न केला. मात्र तेथे चोरट्यांच्या हाती काहीही मौल्यवान ऐवज हाती लागला नाही. असे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध भा.दं.वि.कलम ३८०, ४५४, ४५७, ४२७, ५११ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.