विद्युतपुरवठा खंडित होत असल्याने ऐन उन्हाळ्यात नगरकरांना ‘घाम’

0
31

… अन्यथा महावितरण कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा

नगर – ऐन उन्हाळ्यात नगर शहरासह उपनगरांमध्ये विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक वीजपुरवठा खंडीत केला जात असून, तासन्तास तो पुर्ववत सुरू केला जात नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसामुळे विजेचा वापर वाढला आहे. परंतु अचानक विजपुरवठा खंडीत केला जात असल्याने बाजारपेठेतील व्यावसायिक, व्यापारी, ग्राहकांसह शहरातील नागरिक घामाघूम होत आहेत. वीज का गेली? याबाबत महावितरणच्या कार्यालयात अधिकार्‍यांच्या मोबाईलवर फोन केल्यानंतर कोणताही प्रतिसाद मिळत नाही. याबाबत महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी तात्काळ दखल घेत शहरातील वीज पुरवठा सुरळीत सुरू ठेवावा, अशी मागणी होत आहे. मागील एक महिन्यापासून खंडित व कमी दाबाने विद्युत पुरवठा होत आहे. त्यामुळे त्रासलेल्या नागरिकांनी सुरळीतपणे विद्युत पुरवठा करण्याच्या मागणीचे निवेदन महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना दिले. शहरातील काटवन खंडोबा रोड, गाझीनगर भागात विद्युत पुरवठा करणारे दोन लाईन असून, त्यापैकी एका लाईनवरुन अनेक घरांना वीज पुरवठा होत आहे. मात्र मागील एक महिन्यापासून त्या लाईनची दररोज सकाळी लाईट जाणे किंवा विद्युत पुरवठा कमी दाबाने होणे, अशा समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

दररोज हा प्रकार सुरु असून, या भागातील सबंधित कर्मचारी वर्गाला सांगून देखील या प्रश्नाची सोडवणूक करण्यात आलेली नाही. दररोज सकाळी घरात वीज नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एक प्रकारे भारनियमनाप्रमाणे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना सदर प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना कराव्या. अन्यथा महावितरण कार्यालयात येवून आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे अशोक शिंदे, बिलाल बागवान, रेश्मा बागवान, शाहिन शेख, समिना शेख, कादर सय्यद, इरशाद बागवान, हसिना शेख, खलील शेख आदींनी दिला आहे.