ट्रॅक्टरमध्ये वीजप्रवाह उतरून ऊसतोड मजूर महिलेचा मृत्यू

0
34

एक जण जखमी; ट्रॅक्टरमधून उड्या मारल्याने १५ जण बचावले 

नगर – ऊसतोड मजुर घेवून चाललेल्या ट्रॅटरला मुख्य वीज वाहिनीची तार चिकटल्याने एका मजूर महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर, एक जण भाजल्याने गंभीर जखमी झाला. अन्य १५ जणांनी ट्रॅटरमधून उड्या मारल्याने त्यांचा जीव वाचला. नगर तालुयातील हातवळण-बनपिंपरी रस्त्यावर शिंदे वस्तीजवळ रविवारी (दि. २४) रात्री १० वाजता ही घटना घडली. फुलाबाई नरसिंह जाधव (वय ४५, रा. वरखेडा तांडा, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) असे मयत महिलेचे नाव आहे. तर, अंकुश रोहिदास जाधव (वय ५५, रा. मोराळा, ता. जामनेर, जि. जळगाव) असे जखमीचे नाव आहे. ऊसतोडणीचे काम संपल्याने सोयगाव व जामनेर येथील मजूर रविवारी घराकडे जाण्यासाठी संसारोपयोगी साहित्य ट्रॅटरमध्ये भरून निघाले होते. रात्री १० च्या सुमारास हातवळण – बनपिंपरी रस्त्याने ट्रॅटर नगरच्या दिशेने येत असताना ट्रॅटर मधील लोखंडी खांब महावितरण कंपनीच्या मुख्य वीज वाहिनीच्या तारांना लागले. त्यामुळे संपूर्ण ट्रॅटरमध्ये वीजप्रवाह उतरला. महिलांनी लहान मुलांसह जिवाच्या आकांताने खाली उड्या घेतल्या. त्यात एका महिलेला जबर शॉक लागल्याने जागेवर ती कोसळली. तर, अनेकजण जखमी झाले. जखमी महिलेला तत्काळ उपचारासाठी नगरला हलविले. मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी तिला मृत घोषित केले. तर, डॉटरांच्या खबरीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. रमेश गांगर्डे हे करीत आहेत.