मोबाईल आल्यापासून माणुसकी संपली! : अविनाश भारती

0
31

नगर – सोशल मिडियाने जग एकत्रित आणले पण माणसे दूर गेली. माणूसकी जपणे काळाची गरज आहे. मोबाईल आल्यापासून माणूसकीच संपलीय, असे प्रतिपादन अविनाश भारती यांनी केले. राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री आनंदऋषिजी महाराज यांच्या ३२ व्या स्मृतिदिनानिमित्त श्री आदर्शऋषिजी महाराज यांच्या प्रेरणेने जैन सोशल फेडरेशन आयोजित भगवान महावीर व्याख्यानमालेचे सहावे पुष्प ’दूर करू गारठलेलं माणूसपण’ या विषयावर गुंफताना ते बोलत होते. उद्योजक सचिन भंडारी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संतोष गांधी, सुरेश कटारिया, डॉ.आशिष भंडारी सौ. सरोजभाभी कटारिया, सिमरन मुनोत आदि उपस्थित होते. प्रा.प्रसाद बेडेकर यांनी स्वागत केले. सपना कटारिया यांनी आभार मानले. श्री. भारती पुढे म्हणाले, एकमेकांशी दिलखुलास गप्पा मारण्याचे सुख मोबाईल चॅटींगमध्ये नाही. एकमेकांजवळ बसून डोळे वाचले तरच काळजाचा ठाव घेता येईल. दुसर्‍याच्या डोळ्यांमधील पाणी बघून आपल्या डोळ्यात पाणी आले पाहिजे. दुसर्‍याचे दुःख बघून आपण दुःखी झालो पाहिजे. दुसर्‍याला खरचटले तरी टचकन आपले डोळे पाणावले पाहिजेत. संवेदनशील मनाचा प्रत्येक जण रडतोच. धाय मोकलून रडता आले पाहिजे तसेच मनमोकळे हसताही आले पाहिजे, अशा माणसाचेच जीवन सोन्याहून पिवळे समजावे. माझी माती काळी, माझा विठ्ठल काळा, काळा रंग नवनिर्मितीचा आहे. आभाळ पांढरे असताना कोणालाच आनंद होत नाही पण काळे ढग दाटून आले की, आनंद झाल्याशिवाय रहात नाही. पाऊस येणार असल्याची चाहूल लागते.

आज वर्तमानातील कोणतीही गोष्ट डाऊनलोड करता येते. ऑर्डर देवून घरपोहोच मागवता येते पण माणुसपण डाऊनलोड करता येत नाही! अलिकडे गावपणं हरवलंय अन् माणुसपण गारठलयं! स्मशानात माणूस जळताना पाहूनही डोळ्यात पाणी येत नाही, इतकी दुर्दैवी पिढी निर्माण झालीय. स्मशानातही सिरिअस बसत नाहीत. लोक नावं ठेवतील म्हणून मयतीला जातात. तेथे लग्न जुळवण्याच्या गप्पा केल्या जातात. स्मशानात भाषण करणे हे माणुसकीचे लक्षण नाही. तेथे डोळ्यात पाणी येणे महत्वाचे! अगदी साध्या गोष्टींमधून माणुसकी जपता येते. जगात माणुसकीपेक्षा मोठे धन नाही. आपसात बोलते व्हा हॉस्पीटलला जाण्याची गरज पडणार नाही. होळी साजरी करताना माणसं बोंबलत नाहीत! रंगपंचमीचा आनंद लुटला जात नाही. दिवाळी उत्सव साजरा करताना एकमेकांच्या घरी जाऊन छान गप्पा मारत फराळ करणे हे माणुसकीचे सर्वांत मोठे लक्षण! फराळ तयार करताना महिलांनी एकमेकींकडे जाण्यात आनंदच असायचा. आता फराळाचे तयार पदार्थ घरी आणू लागल्याने माणुसकी संपली. शाळेत जाताना आताच्यासारखे कडक कपडे नव्हते, बेल्ट नव्हता, बूट नव्हता. फाटकेच कपडे ठिगळं लावलेली असायची. कमरेचा करदुडा पॅन्ट सावरायचा. तरी मित्रांमध्ये आपलेपणा असायचा. कंपासपेटी असल्याचा आनंद अ‍ॅपलच्या मोबाईलसारखा व्हायचा. आपल्याला वर्गामधील सर्वांच्या वडिलांचे आणि आजोबांचेही नाव माहित असायचे. आज सगळे असूनही सर्व वर्गमित्रांची नावे माहिती नसतात, याचे आश्चर्य वाटते. तेव्हा आपण एकमेकांचा डबा खात आनंदाने बागडायचो. आताची आई म्हणते तुझ्या टिफीनमधील कोणाला काही देवू नको. मूल एकटेच बसून टिफीन खाते व एकलकोंडे बनत जाते. बाळा तुझ्या टिफीनमध्ये जास्त खाऊ दिलाय तुझ्या मित्रांना देवून तूही खा, असे जेव्हा आई म्हणेल तेव्हाच मुलगा आनंदाने टिफीन संपवत एकमेकांना आधार देत जगायचे असते हे शिकेल. शाळेत गुरूजींनी माणुसकी शिकवण्याचे धडे देणे थांबवले. मारणे कमी केले. परिणामी शिस्त संपली! गावात केटरर्स आला अन् माणुसकी संपली. कितीही लोक येवू द्या. जेवू घालू ही धमक होती. मोजून-मापून स्वयंपाक कधीही केला जात नसे. रात्रभर जागून स्वयंपाक केलेले शेवटच्या पंक्तीत जेवण्याची पध्दत होती. पूर्वी गावातील माणसांवरय्गावावर-मातीवर प्रेम असायचे. संवेदनशील पिढी होती. गावाची किंमत लॉकडाऊनच्या काळात कळली. शहरात भाकर मिळेल का? माहित नाही पण आपल्या गावात आपण उपाशी मरणार नाही या विश्वासानं पावलं गावाकडं वळली.

जीवनाला आधार देण्याचे काम जवळचेच करतात, हे अनुभवास आले. घरातल्या माणसांची किंमत कळली नाही म्हणून वृध्दाश्रम सुरू झाली तिथेच माणुसकी संपली! राजीव दीक्षितांनी म्हटले होते की, वृध्दाश्रम निर्माण होणे हा भारताचा सर्वात मोठा अपमान आहे. कारण भारतीय संस्कृती माणुसकीची आहे. ती जपा. मातृदेवो भव… पितृदेवो भव… अतिथी देवो भव…घरातील माणुसकी जीवंत करा. घरातील भावाचे पाठिशी उभे रहा. एकत्र कुटूंबाकडे पहाण्याचीही हिंमत कोणी करत नाही. लोकांना कपडे वाटप करणारांनी आपला बाप उघडा नाही ना? याची प्रथम काळजी घेतली पाहिजे. आपला हिरो आपला बापच असला पाहिजे. अन्नदान करणारांचे आई-वडिलांना खानावळीचे डबे येतात असे होवू नये. आपल्या जीवनात नैराश्येचे तुफान आले तेव्हा आनंदऋषीजींचा जन्म झाला. एका वटवृक्षाखाली दुसरा वटवृक्ष येत नाही हा निसर्ग नियम असला तरी आनंदऋषीजींच्या छायेत आदर्शऋषीजींचे कार्य बहरले. कत्तलखान्याच्या जागेवर सर्वधर्मियांसाठी आनंदऋषीजींच्या नावाने आरोग्यमंदिर उभारले. माणसाने माणसाशी कसे वागावे? याची ही उदाहरणे प्रेरणा देणारी आहेत, असे श्री.भारती यांनी सांगितले. कविता आणि जुन्या गीतांच्या ओळींमधील शब्दांची ताकद दाखवून देत आताच्या अर्थहिन गाण्यांची खिल्ली उडवताना त्यांनी दाखवलेली प्रात्यक्षिके श्रोत्यांना पोटभर हसवणारी ठरली.