नगर शहरातील उद्योजक ‘आमी संघटने’च्या आंतरराष्ट्रीय तैवान अभ्यासदौऱ्यासाठी रवाना

0
23

नगर – येथील आमी संघटनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या तैवान (विदेशी) अभ्यास दौर्‍यासाठी उद्योजक रवाना झाले आहेत. तैवान येथे टिमटोसय्२४ या औद्योगिक प्रदर्शन व परिषदेत शहरातील उद्योजक सहभागी होणार असून, यामध्ये नव-नवीन मशनरी, सॉफ्टवेअर तसेच जगातील नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली जाणार आहे. यशस्वी उद्योजक निर्माण करुन, औद्योगिकरणाला चालना देण्यासाठी आमी संघटनेच्यावतीने या अभ्यास दौर्‍याचे आयोजन केले आहे. या अभ्यास दौर्‍यामुळे उद्योजकांना नव-नवीन तंत्रज्ञानाची माहिती होवून त्याचा उद्योग व्यवसायात फायदा होणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांच्या भेटीने उद्योगाला चालना मिळून रोजगार निर्माण करण्यासाठी प्रयत्न होणार आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापार करण्याची संधी या दौर्‍यामुळे उद्योजक व व्यावसायिकांना मिळणार असल्याचे आमीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. आमीतर्फे दरवर्षी अशा अभ्यास दौर्‍याचे आयोजन केले जाते. आजपर्यंत ८ वेळा आंतरराष्ट्रीय अभ्यास दौर्‍याचे आयोजन करण्यात आलेले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भरणार्‍या औद्योगिक प्रदर्शन व परिषदसाठी नगरमधील ४० उद्योजक रवाना झाले आहे. १० दिवसीय अभ्यास दौर्‍यात आंतरराष्ट्रीय उद्योग विश्वाची माहिती मिळून त्यांच्या सोबत व्यापाराची संधी मिळणार असल्याचे आमीचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ यांनी सांगितले.