लांडग्याचा मूर्खपणा
एका रानात एक लांडगा राहत होता. एकदा भक्ष्य शोधण्याच्या नादात तो मनुष्यवस्तीत येऊन पोहोचला. रात्र झाली होती. एका घराजवळून जात असता एक बाई आपल्या रडणार्या मुलाला घेऊन दारात उभी असलेली त्याला दिसली, तेव्हा ती दाराच्या आडोशाला उभा राहिला. रडणारे मूल रडण्याचे थांबेना. तेव्हा त्याला कशाची तरी भीती दाखवावी म्हणून ती लटया रागाने म्हणाली, “आता जर का रडायचा थांबला नाहीस, तर बाहेर बसलेल्या लांडग्याला तुला देऊन टाकीन.” असं ती सहज म्हणाली. लांडग्याने बाईचे बोलणे ऐकले. बोलल्याप्रमाणे खरोखरच ती बाई पोराला आपल्याला देईल, असे वाटून लांडगा तेथेच आशाळभूतपणे वाट पाहत बसला. अखेर ते मूल रडून-रडून झोपी गेले. सकाळ होत आली, तसा लांडगा भानावर आला. उजाडल्यावर जर कोणी आपल्याला येथे पाहिले, तर हकनाक प्राणाला मुकू, असे वाटताच लांडग्याने रानाकडे धूम ठोकली. वाटेत त्याला कोल्हा भेटला. आणि पळणार्या लांडग्याला पाहून म्हणाला, “काय लांडगेदादा, वाघ मागे लागल्यासारखे असे धावत का सुटलात?” त्यावर लांडगा म्हणाला, “काय सांगू मित्रा, रात्रभर एका घराच्या दारात वाट पाहात बसलो होतो. एक बाई तिच्या रडणार्या मुलाला भीती दाखवण्यासाठी खोटेच म्हणाली, त्याला लांडग्याला देईल म्हणून. मला ते खरेच वाटले. रात्रभर जागरण झालेच; पण चांगला उपासही घडला बघ.” असे म्हणत लांडगा पुढे निघून गेला. तात्पर्य ः एखाद्याच्या बोलण्याकडे मागचा-पुढचा विचार न करता सहजपणे बोललेल्या शब्दांवर विश्वास ठेवला, तर अशी फसवणूक तर होतेच; पण मूर्खपणाही वाट्याला येतो