नाकात औषध टाकल्याने कावीळ उतरते का?

0
73

नाकात औषध टाकल्याने कावीळ उतरते का?

कावीळ म्हणजे डोळे पिवळे होणे, जीभ पिवळी होणे इत्यादी हे आपल्याला माहीत असते; पण ती का होते, हे तितकेसे माहीत नसते. कावीळ हा संसर्गजन्य आजार आहे. काही प्रकारच्या विषाणूंमुळे हा आजार होतो. हे विषाणू रोग्याच्या विष्ठेने अन्न-पाणी दूषित झाल्याने दुसर्‍याच्या शरीरात जातात व यकृतात बिघाड करतात. ही झाली सामान्यतः होणार्‍या काविळीची कारणमीमांसा. काविळीचे अनेक प्रकार आहेत. पैकी एका प्रकारची कावीळ रक्ताद्वारे संक्रमित होते किंवा लैंगिक संबंधाद्वारे संक्रमित होते. यकृतास विषकारक असणार्‍या औषधी जसे क्षयरोगावरील आय.एन.एच. हे औषध, भूल देण्यासाठी वापरण्यात येणारी औषधे यांच्यामुळेही कावीळ होते. पित्ताशयात खडा झाल्यास, कर्करोग झाल्यास, पित्ताचे वहन करणार्‍या नळीचत अडथळा येऊन पित्त वाहून नेले जात नाही व ते शरीरात पसरून कावीळ होते. रक्तातील लाल पेशींचा नाश जास्त प्रमाणात झाल्यासही कावीळ होते. आता कावीळ म्हणजे नेमके काय? ते आपण बघू. शरीरात नवीन रक्त निर्माण होण्याची तसेच जुन्या रक्तपेशींचा नाश होण्याची प्रक्रिया संतुलित प्रमाणात चालू असते. लाल रक्तपेशी यकृतात, प्लीहेत नष्ट झाल्यावर त्यातून बिलीरुबीन नावाचा पिवळा पदार्थ निर्माण होतो. सामान्यतः हा पदार्थ शौचावाटे बाहेर पडतो. त्यामुळे विष्ठेचा रंग पिवळसर असतो. या पदार्थाचे म्हणजे बिलीरूबीनचे रक्तातील प्रमाण वाढते. यास कावीळ म्हणतात. हा पदार्थ रक्तात प्रमाणाबाहेर साठण्याने डोळे, त्वचा यांत उतरतो व डोळे, त्वचा पिवळे दिसतात. लघवी पिवळी होते. सांगितलेल्या प्रत्येक प्रकारच्या काविळीसाठी वेगवेगळे उपचार करावे लागतात. जसे पित्तवाही नलिकेतील अडथळ्यांसाठी शस्त्रक्रिया करावी लागते. सामान्यपणे होणार्‍या (विषाणूंमुळे होणार्‍या) काविळीमध्ये विश्रांती घेणे, भरपूर कर्बोदके व नियंत्रित प्रमाणात प्रथिने व स्निग्ध पदार्थ असा आहार घेणे व जीवनसत्त्वांचा पुरवठा करणे, हेच प्रभावी उपाय आहेत. कारण या विषाणूंवर परिणामकारक ठरणारे औषध अजून उपलब्ध नाही. आयुर्वेदामध्ये या आजारावर अनेक चांगले उपचार आहेत; परंतु नाकात थेंब टाकून २-३ दिवसांत कावीळ बरी करणे अजून तरी शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले नाही. त्यामुळे भोंदू वैद्याकडून तसे कोणतेही उपचार करून घेऊ नयेत.