समाजसेवा कोणावर उपकार म्हणून नव्हे तर स्वतःची गरज म्हणून करा : अनिकेत आमटे

0
30

लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे यांचे प्रतिपादन

नगर – समाजसेवा कोणावर उपकार करण्यासाठी नव्हे तर स्वतः ला गरज वाटते म्हणून कराल तेव्हाच सेवा घडेल, असे प्रतिपादन लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे यांनी केले. राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री आनंदऋषिजी महाराज यांच्या ३२ व्या स्मृतिदिनानिमित्त श्री आदर्शऋषिजी महाराज यांच्या प्रेरणेने जैन सोशल फेडरेशन आयोजित भगवान महावीर व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प ’माणसांतून माणूस शोधताना’ या विषयावर गुंफताना ते बोलत होते. समाजसेविका सौ. रूपाली जयकुमार मुनोत यांच्या हस्ते वक्त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सौ. सिमरन मुनोत उपस्थित होत्या. सौ. सरोज कटारिया यांनी स्वागत केले. श्री. आमटे पुढे म्हणाले, अती दुर्गम भागात आदिवासी वन्य प्राण्यांसारखेच जीवन जगत असतात. त्यांच्यासाठी आणि वन्य प्राण्यांसाठी सेवा भावनेने काम करताना पैशांमध्ये मोजमाप करता येणार नाही इतके मोठे समाधान मिळते. कामांमधून आनंद मिळतो तेव्हाच सेवा घडते. समाजाचे देणे लागतो या सद् भावनेने स्वतः आनंद व समाधान मिळवताना इतरांनाही आनंद-समाधान देण्याकरिताच समाजसेवेचे व्रत घ्यावे. बाबा आमटे हे आजोबा देवावर विश्वास नसणारे आणि आजी देवभोळी होती. या दोघांनी मिळून आनंदवन उभारले. अनेकांचे संसार फुलवले. आजोबा आणि वडिल प्रकाश आमटे हे दोघेही आदिवासींसाठी काम करताना त्यांच्याशी समरस होत त्यांच्यासारखेच जीवन जगले. त्यामुळेच आदिवासींमध्ये आमच्या परिवाराबद्दल विश्वास निर्माण झाला. श्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या ३२ व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित भगवान महावीर व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे. समाजसेविका सौ. रुपाली जयकुमार मुनेात व्याख्यात्यांचा सत्कार करताना. समवेत उपस्थित श्रोते दिसत आहेत. भगवान महावीर व्याख्यानमाला : पुष्प दुसरे आदिवासींची सहनशक्तीची परिसीमा अनेक प्रसंगी मी जवळून पाहिली. थक्क झालो. त्यांना फक्त आयुर्वेदिक औषधेच आपली वाटतात. रस्ते, वीज, पाणी, मोबाईल अशा कोणत्याही सुविधा नसलेल्या निबिड अरण्यात आदिवासी आनंदाने रहातात. अलिकडे त्यांनाही शिक्षणाची गरज जाणवू लागली आहे. त्याकरिता गरजेला शिक्षण देणारा लोकबिरादरी प्रकल्प सुरू केला आहे. दांडी न मारणारे आदिवासी भागातीलच शिक्षक येथे नेमले आहेत. आजूबाजूच्या आदिवासी पाड्या-वाड्यांसह ८० ते ९० गावांमधील आदिवासी कुटूंबातील मुले शिक्षण घेऊ लागली आहेत. निवासी शाळांपेक्षा अनिवासी शाळांमधील मुले अधिक आनंदी असल्याचे पहावयास मिळते आहे. शाळा सुटल्यावर आई-बाबांजवळ बागडणारी चिमुकली मुले मैलोगणती पायपीट करीत शाळेत येऊ लागली आहेत. शिक्षणामुळे त्यांच्या जीवनात बदल होत असल्याचे दिसत आहे. कंदमुळे आणि शिकारीवर त्यांचे जगणे होते. अलिकडे आदिवासींमधून शिकार करण्याचे प्रमाण कमी होत चालले असून ते उत्तम भातशेती करू लागले आहेत. आपल्या आजोबांनी-पणजोबांनी वन्य प्राण्यांच्या शिकारी केल्याचे आताच्या पिढीस वाईट वाटते आहे. आदिवासींनी जंगलातील अन्न म्हणून वन्यप्राण्यांकडे पाहिले होते. त्यांचे सौंदर्य पाहिले नव्हते. आता तेच प्राणी संवर्धनास मदत करू लागले आहेत. माणसांसोबत काम करताना वन्य प्राण्यांचे जीव वाचवू शकलो, याचे अनमोल समाधान आहे. प्राण्यांवर उपचार करणारे तज्ज्ञ डॉटर आज प्रकल्पाच्या सेवेत आहेत. आजोबांनी आदिवासींना स्वाभिमानाने जगण्यास शिकवले. आपले आनंदवन, सोमनाथ आणि हेमलकसा हे प्रकल्प पहाण्यास या. ग्रामीण आदिवासी मुलांना घडवण्यासाठी खुप मेहनत घ्यावी लागते. शहरात उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर किमान एक वर्ष आदिवासी भागातील समाजसेवेसाठी द्या. स्वतःतच बदल घडलेला अनुभवाल, असे अनिकेत आमटे यांनी आत्मविश्वासाने सांगितले. प्रा.प्रसाद बेडेकर यांनी सूत्रसंचलन केले. संतोष गांधी यांनी आभार मानले