मर्चंट्‌स बँकेच्या कर्मचाऱ्यांना भरीव पगारवाढ

0
18

नगर – अहमदनगर जिल्हा सहकारी बँस एम्प्लॉईज युनियन व अहमदनगर मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँक यांच्यात शुक्रवारी (दि.२२ मार्च) करार होऊन, बँक कर्मचार्‍यांना भरीव पगारवाढ देण्यात आली आहे. हा वेतनवाढीचा करार १ एप्रिल २०२३ पासून पुढील ५ वर्षाकरीता करण्यात आलेला आहे. वेतनवाढीच्या करारावर युनियनतर्फे कार्यकारी अध्यक्ष धनंजय भंडारे, सह सचिव नितीन भंडारी, खजिनदार एम.वाय. कुलकर्णी, कर्मचारी संचालक प्रसाद गांधी, जितेंद्र बोरा यांनी तर बँक व्यवस्थापनातर्फे चेअरमन हस्तीमल मुनोत, व्हाईस चेअरमन अमित मुथा, संचालक सीए अजय मुथा, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल पुराणिक यांनी सह्या केल्या. या करारान्वये बँक व्यवस्थापनावर वार्षिक ४५ लाखाचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. यामध्ये अतिरिक्त वेतनवाढ, महागाई भत्यात वाढ, २० टक्के बोनस, वाहन भत्ता, मेडिकल, शिक्षण या भत्यात वाढ करण्यात आली आहे. तसेच कर्मचार्‍यांना एक महिन्याचा जादा पगार दिला जाणार आहे. या व्यतिरिक्त बँकेतील प्रत्येक कर्मचार्‍यांचा ५ लाख रुपयाचा अपघाती विमा व त्याची पत्नी/पती व दोन मुले यांची २ लाख रुपयाची मेडिलेम पॉलिसी बँकेतर्फे दरवर्षी उतरविण्यात येणार आहे. तसेच बँकेतर्फे कर्मचार्‍यांना दरवर्षी गणवेश दिला जाणार आहे. या कराराने कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. बँकेतील कर्मचार्‍यांना १ लाख रुपये पर्यंतचे वैयक्तिक कर्ज तसेच घरबांधणी करीता १० लाख रु. पर्यंतचे कर्ज सवलतीच्या व्याजदराने देण्यात येणार आहे. मार्केटयार्ड येथील मर्चंट बँकेच्या मुख्य शाखेत वेतनवाढी कराराची बैठक पार पडली. यावेळी चेअरमन हस्तीमल मुनोत म्हणाले की,मर्चंट बँकेतील कर्मचार्‍यांना मिळणारा पगार हा जिल्ह्यातील कुठल्याही नागरी सहकारी बँकेपेक्षा सर्वाधिक असणार आहे. बँकेच्या कर्मचार्‍यांना दि.१ एप्रिल २०२३ पासून फरकाची रक्कम लवकरच अदा केली जाणार आहे. गेल्या ४७ वर्षापासून बँकेचे युनियनशी अत्यंत सौजन्याचे नाते असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. युनियनचे कार्यकारी अध्यक्ष धंनजय भंडारे म्हणाले की, बँकेचे संचालक मंडळ व कर्मचारी यांच्यात अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असून, बँकेचे संस्थापक चेअरमन हस्तीमल मुनोत यांनी रचलेल्या पायावर संचालक मंडळ व कर्मचारी काम करीत आहे. मर्चंट बँकेशी केलेल्या करारनाम्यामुळे इतर बँकेबरोबर करावयाच्या करारनाम्यात कर्मचार्‍यांचा मोठा फायदा होत असल्याचे सांगितले. या बैठकीप्रसंगी बँकेचे संचालक आनंदराम मुनोत, संजय चोपडा, मोहनलाल बरमेचा, किशोर गांधी, संजय बोरा, सीए अजय मुथा, कमलेश भंडारी, किशोर मुनोत, सुभाष बायड, मिनाताई मुनोत, सुभाष भांड आदींसह संचालक उपस्थित होते. यावेळी युनियनच्या वतीने बँकेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. आभार मुरलीधर कुलकर्णी यांनी मानले.