राम मंदिरात चोरी करणारा चोरटा पोलिसांनी २४ तासांत पकडला

0
67

चोरलेली दानपेटी, श्रीरामाच्या पादुका आरोपीकडून केल्या हस्तगत

नगर – नगर तालुयातील चिचोंडी पाटील गावातील सोनार गल्ली येथील श्रीराम मंदिरातून रामाच्या पादुकासह मंदिरातील दानपेटी चोरणारा आरोपी नगर तालुका पोलिसांच्या पथकाने २४ तासाच्या आत पकडला आहे. महादेव बाळू माळी (रा.चिंचोडी पाटील, ता.नगर) असे पकडलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून चोरलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चिचोंडी पाटील गावातील सोनार गल्लीत श्रीरामाचे मंदिर असून तेथे बाळासाहेब आनंदा बेल्हेकर हे पुजारी म्हणून काम पाहतात. ते बुधवारी (दि.२०) पहाटे ५ च्या सुमारास पूजा करण्यासाठी मंदीरात गेले असता मंदीराचा दरवाजा उघडा होता. मंदिराचे कुलुप तुटलेल्या स्थितीत आढळले, मंदीरातील श्रीरामाच्या मुर्तीसमोरील लाकडी पादुका व दानपेटी अज्ञात व्यक्तीने चोरून नेलेली दिसली. त्यांनी याबाबत गावातील नागरिकांना व नगर तालुका पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळताच नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक संपतराव भोसले यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन नगर तालुका पोलीस स्टेशनचे स.पो.नि. प्रल्हाद गीते यांना तत्काळ तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्या दृष्टीने तपास करत असताना स.पो. नि. गीते यांनी स्वतः पथकासह गावातील सर्व सीसीटीव्ही पाहून २४ तासाच्या आत आरोपी निष्पन्न करून आरोपी महादेव बाळू माळी (रा. चिंचोडी पाटील) याला ताब्यात घेतले. त्याच्या कडे कसून चौकशी करत चोरीस गेलेल्या पादुका व दानपेटी व रोख रक्कम हस्तगत केली. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. प्रल्हाद गीते, पोलीस अंमलदार शैलेश सरोदे, सोमनाथ वडणे, शिवाजी खरात यांच्या पथकाने केली.