स्त्रीरोग, गर्भवती महिला आरोग्य तपासणी शिबीराला प्रतिसाद
नगर – आचार्यश्री आनंदऋषीजी महाराज यांचे कृपाशीर्वादाने आणि पूज्य आदर्शऋषीजी महाराज यांच्या अनमोल मार्गदर्शनाने आनंदऋषीजी हॉस्पिटल निरंतर मानवसेवा करीत आहे. जैन सोशल फेडरेशन, हॉस्पिटलमधील सर्व डॉटर, स्टाफ सम्पूर्ण समर्पण देत आरोग्य सेवा देत आहे. त्यामुळे हॉस्पिटल सेवा मंदिर बनले आहे. संपूर्ण भारतात हॉस्पिटल नावाजले जाते. या सेवा कार्याशी जोडले जाणे खरोखरच खूप मोठे भाग्य आहे. महिला आरोग्यासाठी भविष्यातही आम्ही सर्व महिला विशेष प्रयत्न करून महिलांना हॉस्पिटल पर्यंत आणून आरोग्य संपन्न महिला शक्ती साकारण्यासाठी योगदान देऊ आणि या आरोग्य सेवा कार्याचा विस्तार करू असे प्रतिपादन डोनेट फर्स्ट संस्थेच्या स्नेहल अभय बरमेचा यांनी केले. राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी म.सा. यांच्या ३२ व्या स्मृतीदिनानिमित्त आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत स्त्रीरोग, गर्भवती महिला आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. ’डोनेट फर्स्ट’ हेल्पिंग पीपल अराउंड जैन कम्युनिटी या महिलांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या संस्थेच्या सहकार्याने आयोजित या शिबिराचे उद्घाटन अर्पणा भरत बागरेचा, स्नेहल अभय बरमेचा, भावना सुनील छाजेड, दीपिका कमलेश छाजेड, रूतू लोढा व सभासद महिलांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जैन सोशल फेडरेशनचे संतोष बोथरा, माणकचंद कटारिया, प्रकाश छल्लानी, सुभाष मुनोत, डॉ. आशिष भंडारी, तज्ज्ञ डॉ. रवींद्र मुथा, डॉ. सोनल बोरूडे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले, महिलांचे आरोग्य चांगले असेल तर संपूर्ण कुटुंबाचे स्वास्थ्य चांगले राहते. अनेकदा महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे व्याधी बळावते. डिलिव्हरी काळातही योग्य काळजी घेतली तर बाळ सुदृढ जन्माला येते. महिलांमध्ये कॅन्सरही बळावल्याचे आढळून येते. या सर्व समस्यांवर हॉस्पिटलमध्ये चांगले उपचार उपलब्ध आहेत. यासाठी डोनेट फर्स्ट संस्थेच्या महिलांनी पुढाकार घेऊन महिलांसाठी आरोग्य उपक्रम राबविले तर हॉस्पिटल पूर्ण सहकार्य करेल. समाजातील प्रत्येक घटकातील महिलेला या आरोग्य सेवेशी जोडण्याचा प्रयत्न केला तर हॉस्पिटल सातत्याने शिबिरांचा उपक्रम राबवेल. महिला अन्य महिलांशी भावनिकदृष्ट्या बांधलेल्या असतात. त्यामुळे याकामी डोनेट फर्स्ट खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ. रवींद्र मुथा म्हणाले, हॉस्पिटलमध्ये महिला आरोग्यावर अतिशय प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. किचकट आणि गुंतागुंतीच्या डिलिव्हरी याठिकाणी यशस्वीपणे केल्या जातात. महिलांमध्ये आढळणार्या विविध प्रकारच्या कॅन्सरची तपासणी आणि प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त महिलांपर्यंत या सेवेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. शिबिरात सुमारे १८० महिला रूग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिरातील गर्भवती मातांना बाळंतपणावेळी होणार्या फीमध्ये ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. डॉ. आशिष भंडारी यांनी सूत्रसंचालन केले तर प्रकाश छल्लानी यांनी आभार मानले.