राष्ट्रसंत आनंदऋषीजींच्या स्मृतीदिन सोहळ्याचा शुभारंभ; भक्तीसंध्येने श्रोत्यांची ब्रम्हानंदी टाळी

0
21

नगर – राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी महाराजांच्या ३२ व्या स्मृतीदिन सोहळ्याचा शुभारंभ बालगायिका ज्ञानेश्वरी गाडगे हिच्या भक्तीसंध्येने करण्यात आला. सुरेख आवाजातील भजन आणि अभंगांनी उपस्थित सर्वच श्रोत्यांची ब्रम्हानंदी टाळी लागली! प्रबुध्द विचारक आदर्शऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि नरेंद्र फिरोदिया यांच्या विशेष सहकार्याने जैन सोशल फेडरेशन आयोजित व शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशन प्रायोजित भरगच्च कार्यक्रम आनंदधाममध्ये सुरू झाले. इयत्ता ५ वीच्या वर्गात शिकत असलेल्या कु. ज्ञानेश्वरीने नवकार महामंत्राने भक्ति संध्येचा श्रीगणेशा केला. शाहीर होनाजी-बाळा यांनी रचलेली घनः श्याम सुंदरा श्रीधरा अरूणोदय झाला… ही भूपाळी सुप्रभातीच्या मंगलमय वातावरणातील आनंदाचे गूज सांगणारी ठरली. संत मिराबाईंच्या पायोजी मैने राम रतन धन पायो…या भजनावर अनेकांनी ताल धरला. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पद्मनाभा नारायणा… हा अभंग ज्ञानेश्वरीने ताकदीने गायिला. पता नही किस रूप में…हे हिंदी भाषेतील भजन तिने ठेयात गायिले. मेरा आपके कृपा से सब काम हो रहा है | करते हो तुम कन्हैय्या मेरा नाम हो रहा है |…हे भगवान श्रीकृष्णाची स्तुती करणारे भक्तीगीत भाविकांना अधिक भावले. गुरू बिन कोन बतावे बाट…हा संत कबीरांचा अभंग गुरूमहिमा सांगणारा ठरला. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव अशानं भेटायचा न्हाई रे… हा अभंग ज्ञानेश्वरीने ठसयात गाताना संत तुकडोजी महाराजांची अनेकांना आठवण झाली. बोलावा विठ्ठल.. पहावा विठ्ठल…हा संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग ज्ञानेश्वरी गावू लागताच उपस्थित सर्वांनीच विठ्ठल विठ्ठल म्हणत ठेका धरला. याचवेळी श्रोत्यांच्या टाळ्यांची सुरेल साथ मिळाल्याने कलाकारांचा उत्साह दुणावला.

संत पुरंदरदासांचे भाग्यदा लक्ष्मी बारम्मा… हे कानडी गीत कानडी भाषेतील गोडवा दाखवून देणारे ठरले. हे गीत सुरू होताच ज्येष्ठ श्रोतृवृंदास पं.भीमसेन जोशी यांची आठवण झाली. ज्ञानेश्वरीने झी मराठी वाहिनीवरील सारेगमपा लिटिल चॅम्पमध्ये म्हटलेली छाप तिलक सब छिन लिये…ही अमीर खुश्रो यांची सुफी संगीतातील गझल कव्वालीच्या बाजाने सादर करत दमदार तराना गाऊन दमादम मस्त कलंदर…. या बॉलीवूड- मधील गीताला रसिकांकडून वाहवा मिळवली. ज्ञानेश्वरी हिने . गायिलेल्या अभंग आणि भजनांमधील गोडवा सर्वांच्या मनाचा ठाव घेणारा ठरला. तिला कार्तिकी गाडगे या भगिनीने हार्मोनियमची सुंदर साथ दिली. वैभव वीर यांचे पखवाज वादन आणि विशाल पाटील यांचे तबला वादन भक्ति संध्येची उंची वाढवत नेणारे ठरले. रिदनाथ खाडे यांनी कि-बोर्डचे व कुणाल शेळके यांनी अ‍ॅटोपॅडचे लक्षवेधी वादन केले. सुरज पाटिल यांचे साईड रिदम भक्ति संध्येत रंग भरणारे ठरले. ज्ञानेश्वरीचे वडिल गणेश गाडगे यांचे नियोजन कलाकारांची मान उंचावणारे होते. कलाकारांचा सन्मान शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशनच्या आशाताई फिरोदिया, छायाताई फिरोदिया, मनिषा लोढा व प्रमोद गांधी यांच्या हस्ते करण्यात आला. प्रा.प्रसाद बेडेकर यांनी सूत्रसंचलन करताना भक्ति संध्या फुलवत नेली. सरोज कटारिया यांनी आभार मानले. शहराच्या विविध उपनगरातील रसिक स्त्री-पुरूष भाविकांनी भक्ति संध्येचा लाभ घेतला.