शोरूम फोडून मारहाण करत १७ नवीन एलईडी टीव्हींची चोरी

0
41

महामार्गावरील शुभम ट्रेडर्समधील प्रकार; कामगाराला मारहाण; गुन्हा दाखल
नगर – नगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नगर तालुयातील धनगरवाडी येथील टोलनायाजवळ असलेले शुभम ट्रेडर्स नावाचे शोरून रात्रीच्या वेळी फोडून तेथे झोपलेल्या कामगाराला पट्टीने बांधून मारहाण करत सुमारे १ लाख ५५ हजार रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे १७ नवे एलईडी टीव्ही अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना मंगळवारी (दि. १९) १ ते ३.५१ या कालावधीत घडली. याबाबत शोरूम चे संचालक सोपान भिकाजी शिकारे (रा. धनगरवाडी, जेऊर, ता.नगर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी शिकारे यांचे टोलनायाजवळ शुभम ट्रेडर्स नावाचे शोरून आहे. सोमवारी (दि.१८) रात्री शोरूम बंद करून ते घरी गेले होते. शोरूम मध्ये त्यांचा कामगार बाबूलाल सुखु राजभर हा झोपलेला होता. मंगळवारी पहाटे १ च्या सुमारास अनोळखी ४ चोरटे आले व त्यांनी शोरूमच्या पाठीमागील बाजूचे लोखंडी शटर उचकटून आत प्रवेश केला. आवाज झाल्याने कामगार जागा झाला. त्याला या चोरट्यांनी मारहाण करत बॉस पॅकिंग करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या पट्टीने त्याचे हात पाय बांधून टाकले.

त्यानंतर पी.एच. एस. व सॅमसंग कंपनीचे ३२ इंची तसेच ४३ इंची असे १ लाख ५० हजार रुपये किमतीचे १७ नग नवे एलईडी टीव्ही, ५ हजार रुपये किमतीचे तांब्या, पितळ या धातूंचे भांडे असा १ लाख ५५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. चोरटे निघून गेल्यावर काही वेळाने काम गाराने आपली सुटका करून घेतली व मालकाला चोरी बाबत कळविले. ही माहिती मिळताच शिकारे तेथे आले, त्यांनी पोलिसांना फोन करून माहिती दिली. ही माहिती मिळाल्यावर एमआयडीसीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपअधीक्षक अमोल भारती आदींनीही घटनास्थळी भेट देत पाहणी केली. याबाबत शिकारे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात ४ चोरट्याविरोधात भा.दं.वि.कलम ३९४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.