चेन स्नॅचिंग करणारे चोरटे शहर व परिसरात सक्रीय

0
91

स्टेट बँक चौकात सकाळीच महिलेच्या गळ्यातील गंठण पळविले

नगर – नगर शहर व परिसरात काही दिवसांपासून थांबलेले चेन स्नॅचिंगचे सत्र पुन्हा एकदा सुरु झाले आहे. शहरातील स्टेट बँक चौकात महामार्गावर उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण मोटारसायकल वर आलेल्या दोघा चोरट्यांनी सकाळीच हिसका मारून तोडून नेल्याची घटना मंगळवारी (दि.१९) सकाळी ६.४५ ते ७ या कालावधीत घडली आहे. याबाबत सौ. लता भास्कर दराडे (रा. संत वामनभाऊ नगर, पाथर्डी) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या स्टेट बँक चौकात महामार्गावर उभ्या असताना त्यांच्या पाठीमागून एका विना क्रमांकाच्या मोटारसायकल वर दोन अनोळखी चोरटे आले. त्यांनी फिर्यादी दराडे यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसका मारून तोडले व भरधाव वेगात तेथून निघून गेले. या घटनेने घाबरलेल्या दराडे यांनी आरडाओरडा केला मात्र नागरिक जमा होईपर्यंत चोरटे पसार झाले होते. त्यानंतर दराडे यांनी पोलिसांना माहिती दिली. भिंगार कॅम्प पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत चोरट्यांचा शोध घेतला मात्र ते मिळून आले नाहीत. दराडे यांनी याबाबत दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात २ चोरट्यांच्या विरोधात भा.दं.वि.कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक किरण साळुंके हे करीत आहेत.

२ महिन्यांच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा चेन स्नॅचिंग

नगर शहरात यापूर्वी अनेक चेन स्नॅचिंग च्या घटना घडल्या आहेत. या गुन्ह्यांचा तपास करताना २ महिन्या पूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर शहरासह श्रीरामपूर परिसरात चेन स्नॅचिंग करणारे २ सराईत आरोपी पकडले होते. त्यांच्या कडून चेन स्नॅचिंगचे १२ गुन्हे उघडकीस आले होते. पोलिसांनी त्यांच्या कडून चोरीतील सुमारे १५ लाख ७ हजार रुपये किंमतीचे २२.२ तोळे (२२२ ग्रॅम) वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले होते. तेव्हा पासून शहरात चेन स्नॅचिंगच्या घटना थांबल्या होत्या. मात्र २ महिन्यांच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा चेन स्नॅचिंग झाल्याने शहरात चेन स्नॅचिंग करणारे चोरटे सक्रीय झाले की काय ? अशी शंका निर्माण झाली आहे.