दोन सराईत गुन्हेगारांना पकडले; चोरीच्या ३ मोटारसायकली हस्तगत

0
54

नगर – मोटारसायकली चोरणार्‍या २ सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छत्रपती संभाजी नगर रोडवर पांढरीपूल येथे सापळा लावून पकडले असून त्यांच्या कडून २ बजाज पल्सर व १ केटीएम अशा ४ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या ३ महागड्या मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. नगर जिल्ह्यात मोटार सायकल चोरीच्या घटना वाढल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पो.नि.आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील बापुसाहेब फोलाणे, रविंद्र कर्डीले, भिमराज खर्से, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, रविंद्र घुगांसे, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड व संभाजी कोतकर यांचे पथक नेमले होते. या पथकामार्फत तपास सुरु असताना दोघे संशयित इसम चोरीची पल्सर मोटार सायकल विक्री करणेसाठी पांढरीपुल येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पथकाने तातडीने तेथे जावून सापळा लावला संशयित अमित अशोक नगरे (वय २६, रा. नेवासा खुर्द) व नाझिन अजिज शेख (वय २२, रा. लक्ष्मीनगर, ता. नेवासा) यांना पकडले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी ३ मोटारसायकल चोरीची कबुली देत त्या लपवून ठेवलेले ठिकाण सांगितले. पोलिस पथकाने तेथे जावून २ बजाज पल्सर व १ केटीएम अशा ४ लाख ५० हजार रुपये किमतीच्या ३ महागड्या मोटारसायकल हस्तगत केल्या. या मुद्देमालासह आरोपींना राहुरी पोलिस ठाण्यात दाखल मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.