नगर – नगर शहरातील भवानीनगर, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय व आयटीआय परिसरात तसेच कायनेटिक चौकातील प्रियांका कॉलनीमध्ये सोमवारी (दि.१८) रात्री बिबट्या दिसल्याच्या अफवा सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात पसरल्या होत्या. मात्र वनविभागाच्या पथकाने रात्रभर तसेच मंगळवारी (दि.१९) सकाळीही सर्वत्र शोध घेतला असता बिबट्याच्या काहीच खाणाखुणा आढळल्या नसल्याचे वन विभागाचे प्रभारी सहायक वनसंरक्षक तथा वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश राठोड यांनी दैनिक नवामराठा शी बोलताना सांगितले. सोमवारी रात्री भवानी नगर परिसरात बिबट्या दिसल्याचे वृत्त समाज माध्यमांवर वेगात पसरले आणि या ठिकाणी बिबट्याला पाहण्यासाठी आसपासच्या रहिवाशांनी मोठी गर्दी केली. वन विभागाचे प्रभारी सहायक वनसंरक्षक तथा वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश राठोड व वनरक्षक विजय चेमटे व इतर कर्मचारी माहिती मिळाल्यावर जिल्हा उपवनसंरक्षक डॉ सुवर्णा माने यांच्या मार्गदर्शना नुसार तात्काळ त्या भागात पोहोचले. या भागात बराच वेळ फिरून पहाणी केल्यावर बिबट्याबाबत ठोस असे काही आढळून आले नसल्याचे सुरेश राठोड यांनी सांगितले. तसेच गस्ती पथक या भागावर लक्ष ठेऊन असल्याचेही ते म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून शहराजवळ बिबट्या आल्याने शहरवासियांची झोप उडाली आहे. त्यात केडगावच्या भर वस्तीत शिरलेल्या बिबट्याने या भीतीत अजूनच भर घातली. तसेच सोशल मीडियावर व्हायरल होणार्या पोस्टमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होत आहे. शहराच्या आसपास सर्वत्र दाट ऊसशेती असल्याने बिबट्याचा वावर तसा नवीन नाही. बालिकाश्रम रोडवरील सीना नदीच्या पात्राचा भाग, कल्याण रस्त्यावरील बायपासचा परिसर, बुरूडगावचा काही भाग, दौंड रस्त्यावरील काही भाग, औद्योगिक वसाहत परिसर इथे गेल्या अनेक वर्षांपासून बिबट्या दिसल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र केडगावमध्ये भरवस्तीत बिबट्या घुसल्याची घटना घडल्या पासून नागरिक भयभीत आहेत. त्यात सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात अफवा पसरल्या जात असल्याने नागरिकांच्या भीतीत भर पडत आहे, असे ही ते म्हणाले.
तरस व बिबट्यात फरक न ओळखता आल्याने होतो गोंधळ
आपल्याकडे आढळणार्या तरस व बिबट्यात बर्याच वेळा रात्रीच्या अंधारात फरक न ओळखता आल्याने गल्लत होते. बिबट्याच्या आणि तरसाच्या बाह्य रचनेत मोठा फरक असून तरस हा श्वान तर बिबट्या हा मार्जार कुळातील प्राणी आहे. बिबट्याचा रंग पिवळा व त्यावर काळे ठिपके असतात तर तरस हे कुत्र्यासारखे असून थोडे उंच असते याच्या अंगावर काळे पांढरे उभे मोठे पट्टे असतात.याचे पुढचे पाय मागच्या पाया पेक्षा उंच असून त्यामुळे ते चालताना तिरपे दिसते.नगर परिसरात तरसाचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर आहे. भटकी कुत्री, छोटे सस्तन प्राणी व मृत प्राण्याचे मांस खाऊन ते आपली गुजराण करते. तरस कधी कधी एकटे तर काही वेळा तीन चार च्या संख्येने ही पाहायला मिळते.
मनुष्य हा तरस व बिबट्याची शिकार नाही
तरस हा देखील बिबट्या सारखाच निशाचर प्राणी असल्याने
सहसा दिवसा नजरेस पडत नाही.त्यामुळे रात्रीच्या अंधारात डोळे
चमकताना दिसले.
मनुष्य हा तरस व बिबट्याची शिकार नाही
तरी नक्की कोणता प्राणी आसपास आहे हे सर्वसामान्यांना पटकन कळू शकत नाही. बिबट्याच्या मादी सोबतही पिले असल्यास आपल्याला एकाच भागात तीन ते चार बिबट्यांचे दर्शन होऊ शकते. बिबट्या रात्री डुक्कर, कुत्रे, कोंबड्या, छोटी पाळीव जनावरे, पक्षी व इतर छोटे सस्तन प्राणी खाऊन आपली गुजराण करतो मात्र बिबट्या असो वा तरस दोघेही स्वतःहून माणसांवर हल्ला करत नाहीत. मनुष्य हा त्यांची शिकार नाही. तो मानवावर तेव्हाच हल्ला करतो जेव्हा त्याला मानवाकडून होणार्या हल्ल्याची भीती वाटते. त्यामुळे तो एखादे वेळी मानवावर हल्ला करू शकतो असेही त्यांनी सांगितले.
बिबट्या दिसल्यास अशी घ्यावी काळजी
ज्या भागात बिबट्या दिसला आहे त्या भागात गर्दी करू नये. गर्दीच्या गोंगाटाने बिबट्या किंवा कुठलाही वन्य जीव घाबरून पळू लागतो व यावेळी माणसांवर हल्ला होण्याची भीती असते. तसेच तो दिसलेल्या भागात त्याच्या पावलांचे ठसे असतात. आपण त्या भागात ये जा केल्यास ठसे नष्ट होतात. त्यामुळे बिबट्या आहे कि दुसरा वन्य प्राणी हे ओळखणे कठीण होते. बिबट्या दिसल्यास त्या मागे धावू नये किंवा त्यास दगड मारू नये. तो आल्या मार्गाने पुन्हा निसर्गात निघून जाऊ शकतो. मात्र गर्दीने वाट अडवली गेली तर त्याला तिथून जाता येत नाही. रात्री समोर दिसलेल्या वन्य प्राण्याचे कुठलाही धोका न पत्करता मोबाईल कॅमेराने फोटो घेता आले तर पहावे, बिबट प्रवण क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, यामुळे नक्की काय होते हे ते फुटेज किंवा फोटो पाहून त्यातील तज्ज्ञ व्यक्तींना अथवा वन विभागाच्या रेस्कयू पथकास ओळखता येते. कुठलेही जुने व्हिडीओ फोटो सोशल मीडियावर पाठवून अफवा पसरवू नये. अफवा पसरल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरते. शहर किंवा गाव वस्ती लगतच्या शेतात उसाची लागवड करताना एकदम दाटीने ऊस लाऊ नये. यामुळे बिबट्याला लपण मिळते. ऊस तोड कालावधीत त्या भागात एकट्याने काम करू नये किंवा लहान मुलांना त्या शेताच्या जवळपास एकटे सोडू नये. त्या वेळी योग्य ती खबरदारी घ्यावी. पिले शेतात आढळून आल्यास त्यांना अजिबात हाताळू नये. तो परिसर लगेच निर्मनुष्य करून वन विभागास माहिती द्यावी.
सोशल मिडीयावर अफवा पसरवू नका
वन विभागाने रात्री गस्त घालून या भागात बिबट्या बाबत सर्वत्र पाहणी केली मात्र तो आढळून आला नाही. नागरिकांनी मात्र लोकांमध्ये कुठल्याही खात्रीशीर माहिती शिवाय भीतीचे वातावरण पसरेल असे कुठलेही वृत्त सोशल मीडिया वरून प्रसारित करू नये, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश राठोड यांनी केले आहे. बिबट्या एखाद्या भागात असलाच तरी तो एका जागेवर बसून राहत नाही. पाणी किंवा भक्ष्याच्या मागे तो लोकवस्ती असलेल्या भागात येऊ शकतो. आसपास ऊस शेती मोठ्या प्रमाणात असल्याने त्याला चांगले लपण मिळते. यामुळे अशा भागात बिबट्यांचा वावर कायम दिसतो.