रस्त्यावर उभ्या कंटेनरवर कार आदळून चालक ठार

0
48

नगर – रात्रीच्या वेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरवर भरधाव वेगात आलेली मारुती ईरटीगा कार आदळून झालेल्या भीषण अपघातात कार चालक ठार झाल्याची घटना नगर – सोलापूर महामार्गावर साकत (ता.नगर) गावच्या शिवारात असलेल्या शिवसागर हॉटेल समोर सोमवारी (दि.१८) पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली. मैनुद्दीन कलंदर शेख (वय ४५, रा. कोयाळ, ता. आष्टी, जि. बीड) असे मयताचे नाव आहे. मयत शेख हे त्यांची मारुती ईरटीगा कार (क्र. एम एच १६ सी वाय ८९४३) घेवून नगरहून सोलापूर महामार्गाने सोमवारी पहाटे कोयाळ गावाकडे जात असताना साकत (ता.नगर) गावच्या शिवारात असलेल्या शिवसागर हॉटेल समोर रस्त्यात एक कंटेनर उभा होता. कार वेगात असल्याने त्यांना कंटेनरचा अंदाज न आल्याने कार पाठीमागून जोरात कंटेनरवर आदळली. या अपघातात कारचा चक्काचूर होऊन चालक शेख हे गंभीर रित्या जखमी झाले. अपघाताचा आवाज आल्याने आजू बाजूचे नागरिक जमा झाले. त्यांचे चुलत भाऊ शब्बीर अब्दुल शेख हे ही तेथे आले. त्यांनी जखमी शेख यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील मेडिकल ऑफिसर डॉ.ढगे यांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पो.हे.कॉ.गणेश लबडे हे करत आहेत.