नगर – ओ साहेब जरा देख के… दाये भी… बाये भी…उपर भी नीचे भी…ओ साहब जरा देख के असे हे फोटो पाहून प्रत्येक नगरकर नक्कीच म्हणेल पण आम्ही नगरकर एवढे सहनशील आहोत की कधीच प्रश्न विचारणार नाही आणि हो हेच नगरकर वेळ आली तर सत्यासाठी भांडून धडा शिकवल्याशिवाय गप्प राहणारे पण नाही. पण देव जाणे आज नगरकरांना कुठल्याच प्रश्नावर साधं भांडावं पण वाटत नाही. साधा आवाज उठवावा वाटत नाही. माझा नगरकर एवढा सहनशील का बरं झालाय? आज खड्ड्यामुळे खड्डेमय रस्त्याच्या शहरांम ध्ये आपले सहर्ष स्वागत म्हणण्याची वेळ आली आहे. आधी अनेक जड वाहनांमुळे निष्पाप नगरकरांना आपला जीव गमवावा लागला आहे. आज बाह्यवळण रस्ते चकचकीत चार पदरी झाले आहेत तरी देखील अवजड वाहने रोज राजरोसपणे शहरात प्रवेश करतात. निष्पाप नगरकरांचा जीव घेतात. नवीन उड्डाणपूल, बाह्यवळण रस्ते, चौक मोठे झालीत तरी देखील चौका चौकात वाहतूक कोंडी, कुठे रुग्णवाहिकेचा श्वास कोंडलेला, कुठे अतिक्रमणाने रस्त्यांची कोंडी, कुणाला वाहतूक कोंडीमुळे रस्ता मिळत नाही, मग नगरकरांना प्रश्न पडतो तो वाहतूक पोलिस करतात तरी काय? आणि हो हा प्रश्न प्रत्येकाला साहजिकच पडणार आहे कारण तो प्रत्येकाच्या मनी दडलेला आहे.
ई-चलनाचा दम भरून वाहनचालकांची आर्थिक लूटमार, वाहतूक कोंडी व नियंत्रणाकडे दुर्लक्ष
प्रत्येक चौकात वाहतूक पोलिस नेमणुकीस असतानाही वाहतुक कोंडी होतीच कशी? वाहतूक पोलिसांचे यावर नियंत्रण नाही का? तर नगरकरांना आपले वाहतूक पोलिस सध्या करतात तरी काय? तर नगरकरांनो शहर वाहतुकीमध्ये नेमणूकीस असणारे पोलिस कर्मचारी राजरोसपणे दिवसाढवळ्या वाहन चालकांशी आर्थिक मिलीभगत नव्हे लूटमार म्हणता येईल ना? शहरात येणार्या गाड्या थांबवायच्या, अवजड असो की मालवाहतूक, छोट्या मालवाहतूक, प्रवासी वाहतूक गाड्या थांबवायच्या, गाडीला चारी बाजूंनी फेरफटका मारायचा, कागदपत्राची मागणी करायची, फिजिकल फिटनेस आहे किंवा नाही बघायचं, प्रत्येक गाडीत काही ना काही काढायचे आणि मग काय ई – चलन मशीन काढण्याचे, घाई करायची, ड्रायव्हरला मालकाला फोन लावून द्यायला लावायचा किंवा गाडी मालक स्वतः असेल तर ई चलन पावतीचा दम भरायचा अन् गाडी मालकाला पुरता घाम फोडायचा, आपणाला कुणी पाहू नये म्हणून गाडीच्या आडोशाला उभे राहून आर्थिक तडजोड करायची, मग शासनाला बुडवून स्वतःचा खिसा कसा भरता येईल हेच फक्त बघायचे, मग आपण नेमणूकीच्या ठिकाणी असणार्या चौका चौकात वाहतूक कोंडी हो? कोणाचा जीव जावो नाही तर राहो? रुग्णवाहीका वाहतुक कोंडीमध्ये फसून राहू कुणाचा श्वास कोंडू? कोणाचा अपघात होओ? आपली नेमणूक कोठे केली आहे यांचे भान राहो किंवा न राहो? आम्ही नगरकर आहोत ना जबाबदारीने सामाजिक भूमिका वठवायला, यामुळेच खर तर हे वाहतूक पोलिस अहमदनगरकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहेत. पण म्हणतात ना अति तिथे माती.
आज चांदणी चौकात दोन वाहतूक पोलिसांची वाहन चालकांबरोबर चाललेली आर्थिक मिलीभगत बाबतचा व्हिडिओ मिळाला आहे, ज्या ज्या गाड्या पकडल्या जात होत्या त्या सर्व गाड्यांची आर्थिक लूट केली जात होती त्या वाहनाचे व्हिडीओ चित्रिकरण होऊ नये, कोणी फोटो काढू नये यांची पूर्ण खबरदारी घेतली. ते म्हणतात ना ‘इंथ नको तिंथ जाऊ आडोशाला उभ राहु … का? बघत्यात …’ तरी देखील नवामराठा चॅनेलच्या नजरेतून हा व्हिडीओ / फोटो सुटू शकला नाही. आपणास कोणी पाहू नये म्हणून वाहन चालकास त्यांच्याच गाडीमागे आडोशाला सुरक्षित नव्हे इच्छित स्थळी घेऊन जाऊन ई – चलनाचा दम भरायचा, गाडीमालकाने खिशात हात घातला की या साहेबांची ई -चलन मशीन शासनाचे नुकसान करून लगेच म्यान करून कडक नोट आपल्या खिशात घालण्याचा दिवसाढवळ्या राजरोसपणे हा धंदा चालू आहे, पण निर्ढावलेले हे वाहतूक पोलिस कशाचीच पर्वा न करता बिनधास्तपणे आपला धंदा जोमाने चालवत शासनाचा घाटा करून शासनाची नोकरी बजावत जे गाडीमालका बरोबर ठरल तेवढेच घेऊन बाकीचे पैसे परत करीत असल्याचे समोर आले आहे.