खासगी, सार्वजनिक मालमत्तेवरील राजकीय पक्षांच्या जाहिरातीवर कारवाई सुरू

0
40

नगर – लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय पातळीवर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यानुसार शहरातील खासगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवर करण्यात आलेल्या विविध राजकीय पक्षांच्या जाहिराती काढण्याचे, पुसून टाकण्याची कारवाई मनपाने सुरू केली आहे. शहरात निवडणूक आचारसंहिता प्रभावीपणे अमलात आणण्याच्या दृष्टीने महापालिका उपायुक्त डॉ. सचिन बांगर यांनी कारवाईच्या सूचना केल्या आहेत. खासगी मालमत्ता जसे की घराच्या भिंती, संरक्षक भिंती रंगवून करण्यात आलेल्या पक्षाच्या जाहिराती तसेच सार्वजनिक मालमत्तेवर करण्यात आलेल्या जाहिराती पुसून, काढून टाकण्याची कारवाई करण्यात येत आहे. शहरात अनेक ठिकाणी ‘हर घर मोदी, घर घर मोदी’ अशा स्लोगनखाली भाजपने जाहिराती रंगवल्या आहेत. त्यावर पुन्हा रंग लावून त्या पुसून टाकण्यात येत आहेत. खासगी मालमत्ता धारकांनीही त्यांच्या घरावर, भिंतीवरील अशा जाहिराती नष्ट कराव्यात अन्यथा कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.