लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील १८ हजार गुन्हेगारांवर होणार ‘प्रतिबंधात्मक कारवाई’

0
68

नगर जिल्हा पोलिस दलाकडून कारवाईचा आराखडा तयार

नगर – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाली असून नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वीभूमीवर जिल्हा पोलीस अलर्ट झाले आहेत. निवडणुकीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक कारवाईचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार कारवाईस सुरूवात झाली आहे. सुमारे १७ हजार ८९९ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच निवडणुकीसाठी सुमारे ७ हजार पोलीस व सुमारे ४ हजार होमगार्ड असा बंदोबस्त असणार आहे. दोन किंवा दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्यांवर मोक्का, तडीपारी, स्थानबध्दता अशा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यावर पोलिसांनी भर दिला आहे. जिल्ह्यातील पोलीस ठाणे निहाय नियोजन केले आहे. त्याचा आढावा वरिष्ठ पोलीस अधिकार्याकिंडून दररोज घेतला जात आहे. प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत रूटमार्च घेतला जात आहे. ठिकठिकाणी नाकाबंदीचे नियोजन करण्यात आले आहे. नाकाबंदीच्या ठिकाणी स्वत: पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, सर्व पोलीस उपअधीक्षक भेट देत आहे. आचारसंहितेचे पालन करण्यासाठी विविध पथके नियुक्त केली आहेत. अंमली पदार्थ, मोठी रोकड, अवैध मद्य उत्पादन आणि वाहतूक, अग्नीशस्त्रे यांवर विशेष लक्ष असणार आहे. पोलीस ठाणे हद्दीत जास्तीत जास्त कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

संवेदनशील मतदान केंद्रांची यादी तयार करण्यात आली असून तेथेही विशेष लक्ष असणार आहे. जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असणार्याक सुमारे ३ हजार परवानाधारक व्यक्तींना स्वसंरक्षणासाठी दिलेली शस्त्रे जमा करून घेण्यात येत आहेत. त्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. सीआरपीसी १०७ नुसार ९१६४, सीआरपीसी १०८ नुसार ७६, सीआरपीसी १०९ नुसार १८५ जणांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्या जाणार आहेत. सीआरपीसी ११० नुसार १६३९, सीआरपीसी १४४ (२) (३) नुसार १४०९ जणांवर गाव पातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत प्रवेशबंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. फौजदारी दंड संहिता १४९ नुसार ४५४६ जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय महाराष्ट्र पोलीस अ‍ॅट ५५, ५६, ५७ नुसार १८२ जणांना जिल्ह्यातून तडीपार केले जाणार आहे. त्यातील काही गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. तसेच मुंबई पोलीस कायद्यानुसार ६८८ जणांवर कारवाई केली जणार आहे. १० सराईत गुन्हेगारांना ‘एमपीडीए’ नुसार स्थानबध्द केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.