आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या रुग्णसेवा कार्याचा हा यज्ञ कायम तेवत राहो : डॉ. वसंत कटारिया

0
53

नगर – रुग्णसेवा हा एक मोठा पुण्यकर्माचा यज्ञ असून, हे पुण्यसेवेचे कार्य असेच पुढे आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून तेवत रहावो, यासाठी जे काही आवश्यक असेल ते योगदान आम्ही कायमच देत राहू. या रुग्णसेवेच्या कार्यात आम्हाला मिळालेल्या समाधानाचे, योगदानाचे मी मूल्य करू शकत नाही, असे भावनोद्गार हृदयरोग तज्ञ डॉ.वसंत कटारिया यांनी काढून आभार व्यक्त केले. डॉ.वसंत कटारिया यांनी बोलताना आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या परिवाराचे आभार मानले. ते पुढे म्हणाले कि, आमच्या मातोश्री श्रीमती रिमलबाई या अतिशय धार्मिक प्रवृत्तीच्या व संस्कारक्षम अश्या होत्या. त्यांच्या या संस्काराच्या पगड्यावरच आमची आज यशस्वीरीत्या वाटचाल सुरु असून, हजारो अश्या हृदयरोगांवरील रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्याचे पुण्यकर्माचे कार्य या हॉस्पिटलच्या माध्यमातून करण्याचे भाग्य मला मिळाले आहे. आचार्यश्रींचे आशीर्वाद व व प्रबुद्ध विचारक आदर्शऋषीजींचे बहुमोल मार्गदर्शन यासाठी मिळाले असून, श्री वर्धमान महावीर युनिव्हर्सिटीचे कामही मोठ्या प्रगतीपथावर असून, भविष्यात आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या सेवा कार्यात आणखी चांगली भर पडणार असल्याचे सांगितले. जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या ३२ व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून विविध रोगांवरील मोफत तपासणी व अत्यल्प दरात उपचार शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, मूत्रविकार रोगांवरील शिबिराचे उद्घाटन हृदयरोग तज्ञ डॉ.वसंत कटारिया, जेष्ठ उद्योजक व योगदाते प्रकाश मुनोत व सी.ए. रमेश फिरोदिया यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.

याप्रसंगी सौ.सविताताई फिरोदिया, सौ.लता कटारिया, डॉ.अनिकेत व डॉ.प्रतीक कटारिया, सौ. प्रज्ञा, सौ. हर्षा कटारिया, विहान कटारिया, डॉ. प्रकाश कांकरिया, सतीश उर्फ बाबूशेठ लोढा, संतोष बोथरा, प्रकाश छल्लाणी, डॉ.आशिष भंडारी आदी उपस्थित होते. सुरवातीला प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष भंडारी यांनी स्वागत केले. संतोष बोथरा यांनी हॉस्पिटलच्या रुग्ण सेवा कार्याविषयी सविस्तर माहिती दिली व डॉ.वसंत कटारिया यांच्या विषयी त्यांनी गौरवोद्गार काढले. ते म्हणाले कि, डॉ. कटारिया म्हणजे या हॉस्पिटलचे हार्टच असून, कटारिया यांनी या हॉस्पिटलच्या उभारणीपासून रुग्णसेवेसाठी दिलेले तन, मन, धन याचे योगदान हे अमूल्य आहे. आजपर्यंत हजारो हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे त्यांनी करून अनेक कुटुंबियांच्या आनंदात भर टाकली आहे. त्यांच्या या कार्यामुळे सर्व समाजात त्यांच्या प्रति एक आदराची भावना आहे, असे सांगून डॉटरांचे दोन्हीही पुत्र डॉ.अनिकेत व डॉ.प्रतीक कटारिया हे देखील या हॉस्पिटलच्या सेवा कार्यात आपले योगदान देत आहेत त्याबद्दल आनंद व्यक्त केला. सौ. प्रज्ञा कटारिया यांनी देखील समायोसुचित भाषण करून या हॉस्पिटलच्या सेवा कार्याचे कौतुक केले. डॉ.संकेत काळपांडे (मूत्रविकार तज्ञ) यांनी उपस्थित रुग्णांना मार्गदर्शन करून या उपचाराचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. या शिबिरात १४७ रुग्णांनीही तपासणी करून उपचाराचा लाभ घेतला. प्रकाश छल्लाणी यांनी आभार मानले.