गावठी दारूच्या भट्‌ट्यांवर पोलिसांची छापेमारी

0
31

नगर तालुयातील वाळकी व साकत शिवारात कारवाई; दोन स्वतंत्र गुन्हे दाखल

नगर – नगर तालुयातील साकत व वाळकी शिवारात काटवनात सुरू असलेल्या गावठी दारूच्या भट्ट्यांवर नगर तालुका पोलिसांनी रविवारी (दि.१७) सायंकाळी छापे टाकले. तयार गावठी हातभट्टीची दारू, रसायन असा २९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. साकत शिवारात सीना नदीच्या पात्रालगत काटवनात व वाळकी शिवारातील काटवनात गावठी हातभट्ट्या सुरू असल्याची माहिती नगर तालुका पोलिसांना मिळाली होती. सहा. पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी एक पथक तयार करून सदर ठिकाणी छापे टाकण्यास सांगितले. पथकाने सुरूवातीला साकत शिवारातील सीना नदी पात्रालगत सुरू असलेल्या हातभट्टीवर छापा टाकला. ३०० लिटर दारूचे रसायन व ४० लिटर तयार दारू असा १९ हजाराचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला. पोलीसी अंमलदार भरत धुमाळ यांच्या फिर्यादीवरून हातभट्टी चालक मच्छिंद्र लहानु पवार (वय २४ रा. साकत खुर्द ता. नगर) याच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी कारवाई वाळकी शिवारात केली. तेथे १० हजाराची १०० लिटर तयार दारू जप्त करून नष्ट करण्यात आली. पोलीस अंमलदार बाळू चव्हाण यांच्या फिर्यादीवरून हातभट्टी चालक विलास हिरामन पवार (रा. धोंडेवाडी, वाळकी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.