कल्याण रोडवर तरुणावर धारदार शस्राने खुनी हल्ला; गुन्हा दाखल

0
31

नगर – मावस भावाला मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरूणावर धारदार शस्त्राने व लोखंडी रॉडने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आसिफ मन्सुर सय्यद (वय ३४, रा. श्रीकृष्णनगर, कल्याण रस्ता, नगर) असे जखमी तरूणाचे नाव आहे. रविवारी (दि. १७) रात्री साडेआठच्या सुमारास कल्याण रस्त्यावरील उध्दव अ‍ॅकॅडमीच्या मैदनावर ही घटना घडली. जखमी सय्यद यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी उपचारादरम्यान दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरोधात खूनाचा प्रयत्न कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश नामदेव चौधरी, सागर बाळासाहेब गिते, मयुर विजय साळुंके व आनंद सोमनाथ खाकाळ (सर्व रा. श्रीकृष्णनगर, कल्याण रस्ता, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. आसिफ यांना रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास त्यांचा मावस भाऊ इमरान बबन शेख यांनी फोन करून श्रीकृष्णनगर येथील उध्दव अकॅडमीच्या मैदनावर योगेश चौधरी, सागर गिते, मयुर साळुंके, आनंद खाकाळ हे मला मारहाण करत असल्याचे कळविले. आसिफ यांनी मित्र सोनू जगदाळे (रा. नेप्ती) याला सोबत घेत दुचाकीवरून उध्दव अ‍ॅकॅडमीचे मैदान गाठले. तेथे त्यांना त्यांचा मावस भाऊ दिसला नाही, म्हणून त्यांनी तेथे असलेल्या आनंद खाकाळ याला मावस भावाला मारहाण का केली याचा जाब विचारला असता आनंद खाकाळ व इतरांनी आसिफ यांच्यावर धारदार शस्त्र, लोखंडी रॉडने खूनी हल्ला केला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आसिफ यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील अधिक तपास करत आहेत.