दुपारी झालेल्या भांडणाच्या रागातून रात्रीच्या वेळी युवकावर कोयत्याने हल्ला

0
28

नगर – दुपारी झालेल्या भांडणाच्या रागातून युवकावर दगड व कोयत्याने हल्ला केल्याची घटना रविवारी (दि. १७) रात्री बोल्हेगाव उपनगरातील मोरया पार्क येथे घडली. मारहाणीत अमित चंद्रकांत शिंदे (वय २३, रा. गांधीनगर, बोल्हेगाव) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांनी सोमवारी (दि.१८) दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप शहाजी नांगरे, ऋग्वेद नांगरे, संदीप नांगरे याची पत्नी व एक अनोळखी महिला (सर्व रा. मोरया पार्क, बोल्हेगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित यांचे रविवारी दुपारी अडीच वाजता एमआयडीसीतील पारस कंपनी येथे ऋग्वेद सोबत भांडण झाले होते व ते आपआपसात मिटले देखील होते. दरम्यान रात्री अमित हे त्यांच्याकडील टेम्पो घेऊन गांधीनगरकडून एमआयडीसीकडे जात असताना त्यांना संदीप व इतरांनी मोरया पार्क जवळ अडविले. दुपारी झालेल्या भांडणाच्या रागातून कोयत्याने पाठीवर वार केले तसेच डोयात दगड मारून गंभीर जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जखमी अमित यांनी जिल्हा रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर तोफखाना पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.