निस्वार्थ रुग्णसेवेतून अनेकांना नवजीवन देणारे नगरचे आनंदऋषीजी हॉस्पिटल मानवतेचे प्रतिक : प्रकाश शाह

0
39

आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या शिबिरात गरजू रुग्णांची मोफत हृदयरोग तपासणी शिबिराला प्रतिसाद

नगर – निस्वार्थ रुग्णसेवेतून अनेकांना नवजीवन देणारे आनंदऋषीजी हॉस्पिटल मानवतेचे प्रतिक बनले आहे. या आरोग्यसेवेची ख्याती संपूर्ण राज्यात पसरली असून, हे कार्य पाहण्यासाठी पुण्याहून नगरला आलो. या आरोग्य मंदिरातून चोवीस तास मानवसेवा घडत असून, या सेवा कार्यासाठी आनंदऋषीजी महाराजांची शक्ती मिळत असल्याचे प्रतिपादन पुणे येथील उद्योजक प्रकाश शाह यांनी केले. जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या ३२ व्या स्मृतिदिनानिमित्त निरुपाबेन घनशामदास शाह परिवाराच्या वतीने आयोजित मोफत हृदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी शाह बोलत होते. हॉस्पिटलचे निस्वार्थ सेवा कार्य पाहून त्यांचे अशरक्ष: डोळे पाणावले. यावेळी जिगनेशभाई शाह, परागभाई शाह, प्रमय शाह, निलम शाह, तेजल शाह, प्रतिमा शाह, संतोष बोथरा, सतीश लोढा, निखलेंद्र लोढा, प्रकाश छल्लाणी, सुनिल मालू, डॉ. आनंद छाजेड, सुभाष मुनोत, डॉ. अनिकेत कटारिया, डॉ. राहुल अग्रवाल, डॉ. अमित थोपटे, डॉ. विनय छल्लाणी, डॉ. राहुल एरंडे आदी उपस्थित होते. तेजल शाह म्हणाल्या की, सकारात्मक विचाराने आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा सुरु आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या डोळ्यातील समाधान पाहून एक वेगळा आनंद मिळाला.

मानवतेच्या या सेवा कार्यात जोडल्याबद्दल कृतज्ञ झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. डॉ. अनिकेत कटारिया यांनी महिन्याला ६० ते ७० बायपास सर्जरी यशस्वी होत असून, आजपर्यंत ५० हजार पेक्षा जास्त बायपास सर्जरी यशस्वी झाल्या आहेत. यासाठी अद्यावत मशनरी उपलब्ध करून उच्च दर्जाची सेवा दिली जात आहे. हॉस्पिटलच्या टीमवर्कने रुग्णांना अल्पदरात सर्वोत्तम दर्जाची सेवा मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुनिल मालू यांनी शाह परिवाराच्या वतीने सुरु असलेल्या औद्योगिक व सामाजिक कार्याची माहिती दिली. या शिबिरात ११० रुग्णांची मोफत हृदय तपासणी करण्यात आली. गरजेनुसार रुग्णांची बायपास सर्जरी, हृदयातील झडप बदलणे, हृदयातील छिद्र बुजविणे, लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया, अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी अल्पदरात केल्या जाणार आहेत. तर महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत होणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद छाजेड यांनी केले. आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.