उपनगरांसह गावठाण भागाचा देखील विकास सुरु : आ. संग्राम जगताप

0
56

सहकार सभागृह रोड ते महात्मा फुले चौक व व्हिडिओकॉन रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ 

नगर – वाढत्या उपनगरांसह नगर शहरातील मध्यवस्तीतही विकासकामांचा धडाका सुरू असून शहर गावठाणासह उपनगरातील भागांमध्ये राज्य सरकार, केंद्र सरकार व महानगरपालिकेच्या माध्यमातून मूलभूत सोयी सुविधांसह विकासाचे कामे मार्गी लागत असल्याने नगरकर समाधानी आहे. येणार्‍या काळात उपनगरांसह गावठाणाचाही भाग विकसित करून शहर स्वच्छ, सुंदर व हरित म्हणून राज्यासह देशभरात नावलौकिकास येईल. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नगर शहरातील मूलभूत सुविधांसाठी मोठा निधी प्राप्त झाला असून या निधीच्या माध्यमातून विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे काम केले जाईल. असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले. सहकार सभागृह रोड ते महात्मा फुले चौक व व्हिडिओकॉन रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, जेष्ठ विधीज्ञ शरद पल्लोड, विपुल शेटीया, बाबुशेठ लोढा, चंद्रकांत ओव्हळ, शंकर रासकर, लकी खूबचंदानी, अ‍ॅड. राहुल रासकर, अशोक कोठारी, लक्ष्मीकांत जाजू, विजय बोरा, बापूसाहेब ओव्हळ, अरुण रासकर, मनोज मालकर, रमेशचंद्र छाजेड, नंदू पोपटाणी, रामनारायण मंत्री, नानासाहेब पांडुळे, सुभाष ओस्तवाल, राजेश झंवर, सचिन भंडारी, अभय लोढा, वसंतलाल कटारिया, अजय फिरोदिया, मनोहर खूबचंदानी, श्री. पवळ आदीं उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना आ. संग्राम जगताप म्हणाले की, नगर शहरालगत मोठ्या प्रमाणावर उपनगरे तयार झाले असून या उपनगरांच्या विकासासोबतच गावठाण भागाचा देखील विकास कुठे न थांबवता अविरतपणे सुरूच आहे.

शहरातील मुख्य धार्मिक स्थळांना जोडणारे रस्ते विकसित करून येणार्‍या भाविकांना सुलभ पद्धतीने प्रार्थनेसाठी जाता यावे यासाठी दर्जेदार रस्त्यांचे जाळे तयार केले. काही भागांमध्ये आपल्या नगरसेवकांच्या पाठपुराव्यामुळे देखील अनेक विकासाची कामे झाली असून त्या भागांमध्ये देखील निरंतर विकासाची कामे सुरूच राहणार आहे. आज नगर शहरासह उपनगरातील महत्त्वाच्या चौकांचे सुशोभीकरण देखील सुरू असून नगर शहरातील दोन भागांत म्युझिकल फाउंटनच्या माध्यमातून नगर शहरातील नागरिकांना करमणुकीचे एक ठिकाण तयार केले आहे. देशभरातील जैन धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले आनंदधाम परिसरात देखील काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून प्रशस्त व चांगल्या दर्जाचा रस्ता तयार करू शकलो त्यामुळेच नगर शहर बदलतय अशी भावना येथील नागरिकांची झाली आहे याचा मोठा आनंद व समाधान वाटते. यावेळी गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, अ‍ॅड. राहुल रासकर, ज्येष्ठ विधीज्ञ शरद पल्लोड यांनी आपले मनोगते व्यक्त केली. लकी खूबचंदानी यांनी आभार मानले.